पिंपरी | मावळमधून जिल्हा महसूल पंधरवड्याचा शुभारंभ

पिंपरी, – राज्य शासनाच्यावतीने विविध लोककल्याणकरी योजना राबविण्यात येत असून त्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवून या योजनांच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता महसूल विभागाने काम करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
मावळ तालुक्यात वडगाव येथे जिल्हा महसूल पंधरवड्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख आदी उपस्थित होते.
महसूल पंधरवड्यात १५ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याकामी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, आपले प्रलंबित विषय मार्गी लावून घ्यावेत. लोकप्रतिनिधी व नागरिकांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याबाबत वरिष्ठांना माहिती द्यावी, त्यामध्ये नक्की सुधारणा करण्यात येईल, असे डॉ. पुलकुंडवार म्हणाले.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा – डॉ. पुलकुंडवार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी अर्ज सादर केलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया मोहीम स्तरावर सुरू करण्यात आली आहे.
पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. अद्यापही अर्ज सादर न केलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावे असे आवाहन त्यांनी केले.
शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरीता गावपातळी ते जिल्हा पातळीपर्यंत प्रशासन काम करीत असते. प्रशासनाकडून तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी, समस्या, अडीअडचणी सोडविण्याकरीता नेहमी प्रयत्न केले जातात. लोकप्रतिनिधी या नात्याने शासनास सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आमदार सुनील शेळके म्हणाले.
महसूल विभागावरील विश्वास वृद्धींगत करण्याकरीता काम करावे –
विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने महसूल विभागाच्यावतीने नियंत्रण ठेवण्यात येते, त्यामुळे महसूल विभाग आणि नागरिक यामधील नाळ आजही घट्ट टिकून आहे. नागरिकांच्या मनात आपले स्थान राखून नागरिकांची सेवा करावी.
ग्रामीण भागातील नागरिक महसूल विभागाला नेहमीच सहकार्य करीत असल्याने पुणे जिल्हा प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहे. त्यामुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना विश्वास अधिक वृद्धिंगत करण्याकरीता काम करावे, असे जिल्हाधिकारी सुहास डॉ. दिवसे म्हणाले.
यावेळी माजी मंत्री भेगडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय छाननी समितीत पात्र ठरलेल्या महिला लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती योजना, विविध घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र तसेच कुणबी प्रमाणपत्र, शिधा पत्रिका, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र आदी दाखल्याचे वितरण करण्यात आले.
महसूल पंधरवडा –
पुणे जिल्ह्यात महसूल पंधरवडा निमित्ताने २ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ३ ऑगस्ट मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, ४ ऑगस्ट स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, ५ ऑगस्ट कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, ६ ऑगस्ट शेती, पाऊस, दाखले, ७ ऑगस्ट युवा संवाद, ८ ऑगस्ट महसूल-जनसंवाद, ९ ऑगस्ट महसूल ई-प्रणाली, १० ऑगस्ट सैनिक हो तुमच्यासाठी,
११ ऑगस्ट आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, १२ ऑगस्ट एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा, १३ ऑगस्ट महसूल अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण, १४ पंधरवडा वार्तालाप, महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवडा सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.





