Pune : खंडपीठासाठी जिल्ह्यातील वकिलांची बैठक ! लवकरच आंदोलनाची दिशा ठरवणार

पुणे – मुंबई उच्च न्यायालयचे खंडपीठ पुणे येथे सुरू व्हावे, यासाठी वकील पुन्हा आक्रमक झाले आहे. या संदर्भातील मागणीसाठी जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनने बुधवारी (दि. १६) बैठक बोलावली आहे. शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयातील अशोका हॉल समोरील हिरवळीवर ही बैठक होणार आहे. यामध्ये आंदोलनाची दिशा ठरविणारा निर्णय होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू करण्याचा ठराव विधी मंडळात १९७८ साली झाला. त्यानुसार १९८१ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे खंडपीठ सुरू झाले. मात्र, अद्याप येथे सुरू झालेले नाही. या मागणीसाठी वकील आंदोलन करत आले आहेत. आता आंदोलनासाठी पुढाकार घेत पुणे बार असोसिएशनने बैठक बोलावली आहे.
खंडपीठासाठी जिल्हातील वकिलांची बैठक बोलावली आहे. सर्व तालुका आणि वकील संघटनांचे अध्यक्ष, प्रतिनिधी आणि वकील सहभागी होणार आहेत.
– ॲड. हेमंत झंजाड, अध्यक्ष – पुणे बार असोसिएशन




