जिल्हा बँक निवडणूक : शिवाजी कर्डिले, प्रशांत गायकवाड, उदय शेळके, आंबादास पिसाळ विजयी

नगर (प्रतिनिधी) – जिल्हा सहकारी बँकेच्या चार जागांचा निकाल नुकताच लागला असून सोसायटी मतदारसंघातून नगर तालुक्यातून माजी आमदार शिवाजी कर्डिले, पारनेर तालुक्यातून उदय शेळके, कर्जत मधून आंबादास पिसाळ तर बिगरशेती मतदारसंघातून प्रशांत गायकवाड विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी निकाल जाहिर केला. यावेळी विजयी उमेदवारांनी मोठा जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

जिल्हा बँकेच्या 21 पैकी 17 जागा आधीच बिनविरोध झालेल्या आहेत. यात सोसायटी मतदारसंघातील 3 आणि बिगरशेती मतदारसंघातील एक अशा चार जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज रविवारी (दि.21) रोजी सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. यावेळी नगरमध्ये विद्यमान संचालक माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना 94 मते, पारनेरमध्ये विद्यमान संचालक उदय शेळके यांना 99 मते तर कर्जतमध्ये विद्यमान संचालक अंबादास पिसाळ यांना 37 मते पडली. तर या निवडणुकीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून बिगरशेती मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती. 

या ठिकाणी पारनेरचे प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात श्रीगोंद्यातून विद्यमान संचालक दत्तात्रय पानसरे निवडणूक रिंगणात होते. यामध्ये प्रशांत गायकवाड यांना 763 मते मिळवून विजयी झाले. तर पानसरे यांना 574 मते मिळाली. तर सत्यभामा बेरड यांना 15 मते, रामदास भोसले 6 तर मिनाक्षी सांळुके 36 मते पडून एक मतांनी पराभव स्विकारावा लागला.  निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांच्या नियोजनात सहायक निवडणू निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे, किशन रत्नाळे यांच्यासह मतमोजणी प्रक्रियेसाठी अधिकारी,कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच पोलिस बंदोबस्त तैनात होता.

कारखानदार मंडळींवर लवकरच गौप्यस्फोट : कर्डिले

आम्ही मागील पाच वर्षात दुष्काळी भागातील शेतकरी, दूध उत्पादक व महिला बचत गटांना दिलासा देण्याचे काम बँकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून केले. परंतु ते जिल्ह्यातील कारखानदारांना भावले नाही. त्यामुळे मी संचालक होऊ नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मला पाडण्याचा आटोकाट प्रयत्न जिल्ह्यातील प्रस्थापित मंडळींनी केला. परंतु तो अपयशी ठरला आहे.

माझा विजय झाला असून यापुढेही जिरायत भागातील शेतकर्‍यांसाठी तसेच दूध उत्पादक व महिला बचत गटांसाठी सातत्याने आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आमची यापुढे भूमिकाही या शेतकर्‍यांना साथ देण्याची राहणार आहे, असे माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले. तसेच या कारखानदार मंडळींवर लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचे ही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.