नेवासा – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष विधानसभा निवडणूक लढविणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार आपणच असल्याचे आव्हान शिंदे यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे आता थेट उद्धव ठाकरे यांना भिडण्याचा मास्टर प्लॅन आखला जात आहे. जिथे ठाकरे तिथे शिंदेंचा उमेदवार रणांगणात उतरविण्याचा नवा फंडा शिंदे गटाकडून आखला जात आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या ठाकरे सेनेचे उमेदवार, माजी मंत्री आणि आमदार शंकरराव गडाख, मशाल चिन्हावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे सेनेचा उमेदवार उतरवण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दैनिक ‘प्रभात’ला दिलेल्या माहितीनुसार, शिंदे सेनेकडून प्रसिद्ध उद्योजक प्रभाकर शिंदे (काका) यांना रणांगणात उतरवण्याची तयारी आहे. दैनिक ‘प्रभात’शी बोलताना सूत्रांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच झाली होती. आता विधानसभा निवडणुकीतही तशीच परिस्थिती होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भाजपच्या हाय कमांडकडे मोठ्या प्रमाणात जागा मागितल्या आहेत. त्यामुळे ठाकरे सेनेच्या विरोधात शिंदे सेनेचा उमेदवार उतरवून वर्चस्वाची लढाई लढण्याची तयारी आहे. राज्यात ठाकरेसेना विरुद्ध शिंदेसेना असा सामना रंगणार आहे. त्यामुळे नेवासा विधानसभेची भाजपची जागा शिंदे सेनेकडे येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार गडाख यांच्या विरोधात उद्योजक प्रभाकर शिंदे यांना मैदानात उतरविण्याची चाचपणी सुरू आहे. राज्याच्या प्रत्येक मतदारसंघातील जातीय समीकरणे, महायुतीतील मित्रपक्षांच्या तुलनेत शिवसेनेच्या उमेदवारांची राजकीय ताकद आणि जरांगे फॅक्टर विचारात घेऊन हे राजकीय समीकरण आखले जात आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे आणि मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे ‘दूध का दूध और पानी का पानी’ करण्यासाठी ही विधानसभा निवडणूक लढविली जाणार आहे. महायुती धर्म म्हणून एकमेकांचे नेते ऐनवेळी पक्षात घेऊन उमेदवारी न देता, नवा चेहरा म्हणून शिंदे सेनेकडून उद्योजक प्रभाकर शिंदे (काका) यांच्याकडेच अधिक लक्ष आहे. जर-तरच्या मुद्द्यांतून मार्ग काढण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. राजकारणातील पडद्यामागचे हिरो समजले जाणारे प्रभाकर शिंदे (काका) सध्या तिकीट मिळविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. शिंदे सेनेकडून काकांचीच चाचपणी होत असल्यामुळे हे चित्र स्पष्ट झाले तर विरोधक एकत्र येऊ शकतात, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. त्यामुळे शिवसेनाही त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.