nagar | आमदारांच्या कार्यालयासमोरून दुचाकी चोरीला
जामखेड, (प्रतिनिधी) – चोरटे कधी आणि कुठे चोरी करतील, याचा काही नेम नाही. आता शहरातील आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोरूनच एकाची दुचाकी चोरीला गेली. येथील खर्डा रोडवरील आमदार रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर महेंद्र बारस्कर यांनी मोटार सायकल (GJ १६ m ४८२०) पार्क करून कामानिमित्त निघून गेले. नंतर ते पार्किंग ठिकाणी आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही.
आमदार कार्यालयासमोर पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही बाब महेंद्र बारस्कर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांना दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी जामखेड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात मोटार सायकल चोरीला जाण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. आमदार महोदयांच्याच कार्यालयासमोरून गाडी चोरीला जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. दुचाकी चोरीच्या घटना देखील सातत्याने समोर येत आहे. शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे.
ठिकठिकाणी नाकाबंदी करून शहरातील चोरांना पकडण्याचा प्लॅन पोलीस करत आहे. मत, त्याच चोरांनी जामखेड पोलिसांना आव्हान दिले आहे. शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीच्या घटना वाढत चालल्या आहे.





