Indori News : इंदोरीत शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप
Indori News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा उत्पादन वाढविण्याचे आवाहन

वडगाव मावळ – दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चारा उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने इंदोरी येथे चारा साक्षरता अभियान आणि मका बियाणे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यकीय केंद्रात हा कार्यक्रम पार पडला.
जिल्हा परिषद सदस्य पल्लवी दाभाडे आणि पंचायत समिती मावळचे गटनेते दिलीप ढोरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शेतकरी विठ्ठल ढोरे, आबासाहेब काशीद, शरद भोंगाडे, इंदोरीच्या माजी उपसरपंच रेश्मा शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मुळीक यांनी पशुपालकांना जनावरांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
गटनेते दिलीप ढोरे म्हणाले, पशुपालन व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी जनावरांना सकस आणि पौष्टिक चारा मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी चारा पिकांचे उत्पादन वाढवून वर्षभरासाठी चाऱ्याचे नियोजन करावे. मका बियाणे वाटपामुळे पशुपालकांना चारा उत्पादनासाठी मदत होईल.
जिल्हा परिषद सदस्य पल्लवी दाभाडे म्हणाल्या, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाला महत्त्व आहे. जनावरांना पुरेसा आणि सकस चारा उपलब्ध झाल्यास दुग्धोत्पादन वाढण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.





