पिंपरी | कडधे गावात लाभार्थी शेतकऱ्यांना निविष्ठा वाटप

पवनमावळ, (वार्ताहर) – मावळ तालुका कृषी विभाग आणि मंडळ कृषी अधिकारी काले-कॉलनी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पवन मावळ विभागात १० हेक्टर क्षेत्रावर आणि २५ लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात चालू वर्षात ‘चारसूत्री भात लागवड प्रकल्प’ राबविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कडधे येथील लाभार्थी शेतकऱ्यांना आझेटोबॅक्टर, पीएसबी, ट्रायकोड्रामा, बांधावर लागवडीसाठी तूर बियाणे वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले.
कडधे येथे कृषी विभागाकडून चारसूत्री पिक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत आहे. यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतावरील ०.४० क्षेत्रावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. यात लाभार्थी शेतकरी बबन किसन तुपे, हरिश्चंद्र घरदाळे, राजू खराडे, नारायण किसन तुपे, अमोद अरविंद गांधी, वंदना तुळशीराम यादव, शामराव दामू शिंदे, मारुती नामदेव तुपे यांना कृषी विभागाकडून निविष्ठा वाटप करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहाय्यक शीतल गिरी यांनी केले होते.
‘चारसूत्री भात लागवड पद्धतीत कमी रोपांची आवश्यकता भासते. भात लावणीला कमी देखील वेळ लागतो आणि बियाणे कमी लागल्यामुळे बियाणांचा खर्च कमी येतो. यूरिया ब्रिकेट खतामुळे भाताच्या उत्पादनात २ ते ३ पट वाढ होणार असून कृषी विभागाच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होत आहे.’ – शेतकरी भरत तुपे, मळवंडी ठुले.
‘सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करणे, उत्पादन खर्च कमी करणे, भात लागवडीत चारसूत्री पद्धत क्षेत्र वाढविणे हे या प्रकल्प राबविण्याचे मुख्य उद्देश आहेत.’ – शीतल गिरी, कृषी सहाय्यक, कडधे.





