पुणे जिल्हा | सणसवाडीत माहेरवाशिनी महिलांना ९० कुकरचे वाटप

भोर, (प्रतिनिधी) – सणस वाडी (शिंद ता.भोर) येथे गावच्या यात्रेचे औचित्य साधून माहेरवाशिणींसाठी खास हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन न्यू आझाद तरुण मंडळ सणस वाडी व ग्रामस्थ मंडळ, सणसवाडी यांनी केले. तसेच यावेळी ९० कुकरचे वाटप करून समाजात एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
शिंद गावातील सणसवाडी म्हणून ओळख असलेल्या या वाडीतील तरुणांनी एकत्र येवून माहेरवाशिणींसाठी यात्रेचे औचित्य साधून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले. यामध्ये आपल्या वाडीतील मुलगी लग्न होऊन गेली, त्या सर्वांना आमंत्रित करण्यात आले. या माहेरवाशिणीसाठी कुकर भेट स्वरूपात देण्यात आले. या कार्यक्रमास ९० माहेरवाशिणी सहभाग नोंदविला.
या अनोख्या हळदी कुंकू कार्यक्रमांचा मुख्य हेतू ज्या मुली आपल्या वाडीतून लग्न होऊन गेल्या त्यांच्या जुन्या मैत्रिणी भेटतील व आपल्या जीवनातील सुख दुःखाचे क्षण एकमेकींना सांगून आपल्या लहानपणीचे दिवस आठवतील.हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. यावेळी कार्यक्रमास न्यू आझाद तरुण मंडळ सणसवाडी व ग्रामस्थ मंडळ सणसवाडी उपस्थित होते.





