अमेरिकेच्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा विस्कळीत

प्रसूती सेवा बंद केल्यामुळे गरोदर महिलांची अडचण
वॉशिंग्टन : भारतातील किंवा इतर अनेक विकसनशील देशांमधील आरोग्य सेवांच्या उपलब्धतेवर नेहमीच टीका केली जाते पण सर्वात प्रगत देश म्हणून ज्या देशावर शिक्का मारला जातो, त्या अमेरिकेतील ग्रामीण भागातील आरोग्य सेवाही विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी प्रसूती सेवा बंद केल्यामुळे शेकडो गरोदर महिलांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
करोना महामारीच्या कालावधीनंतरच अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती ती सेवा अजूनही पूर्ववत झालेली नाही. विशेषता ग्रामीण भागाला त्याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या काही कालावधीमध्ये अमेरिकेतील अनेक छोट्या गावांमध्ये प्रसूती सेवा बंद करण्यात आल्याने परिसरातील महिलांना त्याचा फटका बसला आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील ओकामा इंडियन रिझर्व या छोट्या गावातील प्रसुती कक्ष गेला महिन्यात बंद केल्यानंतर या गावातील महिलांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. या गावांमध्ये सध्या 35 गरोदर महिला असून त्यांना बाळंतपणासाठी इतरत्र आरोग्य सेवेचा शोध घ्यावा लागणार आहे.
2015 ते 2019 या चार वर्षांच्या कालावधीमध्येच अमेरिकेतील ग्रामीण भागातील तब्बल 89 प्रसूती कक्ष बंद करण्यात आले होते. त्यानंतर कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये आणखी काही कक्ष बंद करण्यात आले. आजघडीला अमेरिकेतील ग्रामीण भागात निम्म्यापेक्षा जास्त गावांमध्ये प्रसूती कक्ष संपूर्णपणे बंद आहेत. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे कक्ष चालवणे फायदेशीर ठरत नसल्यानेच अमेरिकन आरोग्य प्रशासनाने हे सर्व कक्ष बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेतील ग्रामीण भागातील प्रसूती सेवा अद्यापही संपूर्णपणे सक्षम नसल्याने गेल्या काही कशामध्ये तेथील प्रसूती काळातील मृत्यूदरातही वाढ झाली आहे. अमेरिकेतील आरोग्य क्षेत्रात काम करणारी मार्च फॉर डाइम्स या एनजीओने दिलेल्या माहितीप्रमाणे, अमेरिकेत सत्तर लाख महिला अशा आहेत ज्यांच्या घराच्या आसपास कोठेही प्रसुती सेवा उपलब्ध नाहीत. प्रशासनाने फायदा तोट्याचा विचार न करता ग्रामीण भागात सर्वत्र आरोग्य सेवा आणि प्रसुती सेवा उपलब्ध करून द्यायला हव्यात अशी मागणी आता या एनजीओने केली आहे.





