Dis’Qualified MP: खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटरच्या bio मध्ये केला ‘हा’ मोठा बदल

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मानहानी खटल्यात खासदारकी रद्द झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून राजकीय वादळ उठल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरातून या निर्णयाच्या विरोधात निदर्शने सुरु आहेत. त्यातच या प्रकरणानंतर आता राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटमध्येही मोठे बदल केले आहेत. या बदलाची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासदार झाल्यानंतर त्यांच्या ट्विटर बायोमध्ये बदल केले आहेत. आता राहुल गांधी यांनी आपल्या बायोमध्ये ‘डिस्क्वालिफाईड एमपी’ (‘Dis’Qualified MP) चा विशेष उल्लेख केला आहे.
खरं तर, राहुल गांधींना त्यांच्या ‘मोदी आडनाव’वरून करण्यात आलेल्या मानहानीचा टिपण्णीवरून दोषी ठरवण्यात आले. तसेच खासदार म्हणून त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर राहुल यांनी आज त्यांच्या बायोमध्ये अपात्र खासदार असा खास शैलीत उल्लेख केला आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच पक्षाकडून आज एकदिवसीय संकल्प सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत.





