डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायतमध्ये विविध विकास कामांमध्ये गंभीर स्वरूपाची दप्तरी अनियमितता आढळून आल्याने तीन तत्कालीन सरपंचापैकी दोन तत्कालीन सरपंच नितीन ज्योतीराम शेडगे, व तत्कालीन सरपंच वैशाली संतोष मासाळ यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. यात त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून देखील काढून टाकण्याचा आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुंडकुलवार यांनी दिले आहेत. झारगडवाडी ग्रामपंचायत मध्ये सन २०२०-२१ ते सन २०२३ – २४ मध्ये झालेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचे सात मुद्द्याच्या आधारे सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समिती स्थापन करून त्या मुद्द्याच्या अनुषंगाने सखोल दप्तर तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सखोल दप्तर तपासणीनंतर सदर समितीने अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय व दप्तरी अनियमितता असल्याचे उघड झाले होते. पुणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार दालनामध्ये सुनावणी घेऊन दोन्ही बाजूच्या दस्तऐवजाच्या आधारे ग्रामपंचायत झारगडवाडी मध्ये गंभीर स्वरूपाच्या प्रशासकीय व दप्तर अनियमितता असल्याचे शिक्कामोर्तब करून अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर केलेला होता. यामुळे पुणे विभागीय आयुक्त याबाबत काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुंडकुलवार यांनी अर्जदार युवराज पांडुरंग पोटे यांच्या केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व बाबी तपासून तीन तत्कालीन सरपंचापैकी दोन तत्कालीन सरपंचावर अपात्रतेची कारवाई केली आहे. त्यांचे ग्रामपंचायत मधील सदस्य पदही अपात्र केले असल्याचा निकाल २३ सप्टेंबरला २०२५ ला दिला आहे. याबाबत अर्जदाराच्यावतीने स्वतः ॲड. युवराज पोटे यांनी आपली बाजू खंबीरपणे मांडली होती तर अपात्र झालेल्या तत्कालीन सरपंचाच्या वतीने ॲड. खान यांनी बाजू मांडली होती. बेकायदेशीर कामे चालली होती – झारगडवाडी गावामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व बेकायदेशीर कामे चालली होती याविरुद्ध मी तक्रार दिली होती. 23 सप्टेंबर 25 रोजी आयुक्त साहेबांनी आदेश देऊन दोघांना अपात्र केले असले तरी अपहार केलेल्याची रक्कम वसुली व ग्रामपंचायत कागदपत्रांमधील फेरफार बाबत पाठपुरावा करून न्यायाची मागणी पुणे आयुक्त व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे ॲड. युवराज पोटे यांनी सांगितले आहे. वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार – सदर आलेला निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता, याबाबत आम्ही वरिष्ठ न्यायालयात लवकरच दाद मागणार असून खरी वस्तुस्थिती कोर्टासमोर मांडणार आहोत. न्यायदेवता आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला खात्री आहे, असं अपात्र झालेल्या तत्कालीन सरपंच वैशाली संतोष मासाळ यांनी सांगितले आहे.