मनसे-ठाकरे गटाच्या पहिल्याच बैठकीत राडा: नेते एकमेकांवर भडकले, चर्चेचा विषय बाजूला, वादाचीच चर्चा

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) पक्षाची नाशिकमध्ये आयोजित पहिली एकत्रित बैठक वादाच्या भोवऱ्यात सापडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा असताना या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र, ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमधील वादामुळे बैठकीत नियोजित मुद्द्यांऐवजी राड्याचीच जोरदार चर्चा नाशिकमध्ये रंगली.
निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक, पण वादाने घेतले वेगळे वळण –
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते सकारात्मक असल्याचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नाशिकमधील रस्त्यांवरील खड्डे, वाढती गुन्हेगारी, अनियमित पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित होती. मात्र, ही बैठक ठाकरे गटाच्या नेत्यांमधील वादामुळे गाजली.
जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यात जुंपली –
बैठकीदरम्यान ठाकरे गटाचे नेते जयंत दिंडे यांनी विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या रणनीतीवर भाष्य केले. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात वसंत गिते यांच्या पराभवाचा उहापोह करताना त्यांनी प्रचारादरम्यान एमडी ड्रग्जसह इतर मुद्दे नीट हाताळले न गेल्याची खंत व्यक्त केली. यावर माजी महापौर आणि निवडणूक प्रचाराची जबाबदारी सांभाळणारे विनायक पांडे यांनी आक्षेप घेत दिंडेंचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. वाद विकोपाला गेल्याने विनायक पांडे यांनी संतप्त होऊन बैठकीतून काढता पाय घेतला.
मुद्द्यांपेक्षा वादाचीच चर्चा –
या बैठकीत स्थानिक निवडणुकीसाठी रणनीती ठरविणे आणि नाशिकच्या समस्यांवर चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, ठाकरे गटाच्या नेत्यांमधील वादामुळे बैठकीला वेगळेच वळण मिळाले. परिणामी, नियोजित मुद्द्यांऐवजी या राड्याचीच जोरदार चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.





