मुंबई : दिशा सालियानचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी याचिकेतून केला आहे. या याचिकेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणात सालियान कुटुंबावर दबाव असल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज एका वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, हे प्रकरण कोर्टात आहे. ज्या गोष्टी घडल्या नाहीत, त्या गोष्टी घडल्या आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. या गोष्टीला कोर्टात उत्तर दिले जाईल. या प्रकरणावर पोलीस तपास करतील. मी ज्यावेळी महापौर होते त्यावेळी त्यांचे आई-वडिल मला भेटायला आले होते. ज्यावेळी मी त्यांच्या घरी गेली तेव्हा माझ्यासोबत पोलीस, पत्रकार महिला आयोगाच्या दोन सदस्या होत्या. यावेळी त्यांचे कुटुंब आमच्या मुलीची बदनामी होता कामा नये, असे सांगत होते, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. पुढे म्हणाल्या, दिशाची आत्महत्या आहे, असे ते म्हणत होते. आम्हाला त्रास होता कामा नये असे त्यांचे मत होते. आई- वडिल म्हणून पाच वर्षानंतर आलेल्या जागेला पाच वर्षे तपास झाला आहे. तपासावर अविश्वास दाखवता येणार नाही, पाच वर्षानंतर असे काय घडले. आता दे दबावाखाली आहेत असे वाटत आहे, असा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे : करुणा शर्मा दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे. जसे दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे, तसा पूजा चव्हाणला पण न्याय मिळाला पाहिजे. पूजा चव्हाणचे सर्व पुरावे मीडियाकडे आहेत. तिचा पण मर्डर करण्यात आला, तिला पण न्याय मिळाला पाहिजे. पूजा चव्हाणचा मर्डर झाला, तेव्हा ती प्रेग्नेंट होती. त्यावेळेस संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता. पण, हा मुद्दा शांत झाल्यानंतर ते आता मंत्री आहे. सत्तेचा गैरवापर करणारे लोक सत्तेमध्ये नको, असे करूणा शर्मा यांनी म्हटले आहे.