Disha Pardeshi Dance: ‘देख तुनी बायको कशी…’ अहिराणी गाण्यावर ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्रचा धमाल डान्स

Disha Pardeshi Dance : ‘लाखात एक आमचा दादा’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा परदेशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही सक्रिय असलेली दिशा तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता तिने अहिराणी गाण्यावर केलेल्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला असून, तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
दिशा परदेशीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘देख तुनी बायको कशी नाची रायनी’ या गाजलेल्या अहिराणी गाण्यावर ती ठेका धरताना दिसते. डान्स करताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसत असून, तिच्या नृत्याच्या स्टेप्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ती एकटीच नाचत असली तरी आजूबाजूचे लोक तिला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.
View this post on Instagram
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी तिच्या डान्सचे आणि उत्साही अंदाजाचे कौतुक केले आहे. ‘देख तुनी बायको कशी नाची रायनी’ हे अहिराणी भाषेतील गाणे काही काळापूर्वी सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड झाले होते. सामान्य लोकांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांनी या गाण्यावर डान्स व्हिडीओ शेअर केले होते.
दिशा परदेशीने ‘मी कन्याकुमारी’, ‘एकापेक्षा एक’, ‘बुगी वुगी’ अशा विविध रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत तिने साकारलेली तुळजा ही भूमिका विशेष गाजली होती. मालिका अर्ध्यात सोडल्यानंतरही ती म्युझिक व्हिडीओ आणि निर्मिती क्षेत्रात सक्रिय आहे.
दरम्यान, दिशा परदेशी पुढे कोणत्या मालिकेत किंवा नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





