Baththa and Irumudi : मुलीसाठी जीवाचं रान करणारा बाप! विजय सेतुपती, रवी तेजाचे हे चित्रपट पाहून डोळे पाणावतील
Baththa and Irumudi : या चित्रपटांमध्ये बाप-मुलीच्या नात्याची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. या दोन्ही चित्रपटांची कथा पूर्णपणे वेगळी आहे. मात्र, दोन्ही चित्रपटांमध्ये मुलीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या वडिलांची भूमिका मध्यवर्ती आहे.

Baththa and Irumudi : बाप आणि मुलीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर आणि भावनिक नात्यांपैकी एक मानलं जातं. या नात्यातील प्रेम, काळजी, त्याग आणि मुलीसाठी काहीही करण्याची वडिलांची तयारी अनेक चित्रपटांमधून पाहायला मिळाली आहे. साऊथ चित्रपटसृष्टीतील असेच दोन चित्रपट सध्या चर्चेत आहेत. ‘बथ्था’ आणि ‘इरुमुडी’.
या चित्रपटांमध्ये बाप-मुलीच्या नात्याची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. या दोन्ही चित्रपटांची कथा पूर्णपणे वेगळी आहे. मात्र, दोन्ही चित्रपटांमध्ये मुलीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या वडिलांची भूमिका मध्यवर्ती आहे. अभिनेता विजय सेतुपती याने ‘बथ्था’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे, तर ‘इरुमुडी’मध्ये रवी तेजाने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
बथ्था’मध्ये पाहायला मिळणार भावनिक नातं
‘बथ्था’ या चित्रपटात विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा एका खोलीत बंदिस्त झालेल्या बथ्थाभोवती फिरते. शबरी नावाचा मुलगा त्याला एका खोलीत कोंडून ठेवतो. जवळपास आठवडाभर तो त्या खोलीत असतो. त्यानंतर घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमुळे चित्रपटाची कथा वेगळे वळण घेते. शबरीच्या येण्यामुळे बथ्थाच्या आयुष्यात आणि विचारांमध्ये बदल घडू लागतात. चित्रपटातील भावनिक प्रसंग आणि नात्यांची गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
इरुमुडी’मध्ये मुलीसाठी कोणत्याही थराला जाणारा बाप
दुसरीकडे, ‘इरुमुडी’ चित्रपटात रवी तेजा मुख्य भूमिकेत दिसतो. त्याचे आपल्या मुलीवर प्रचंड प्रेम असते. तिच्या आनंदासाठी तो काहीही करण्यास तयार असतो. मात्र, समाजातील क्रूर प्रवृत्तीचा त्याच्या मुलीला सामना करावा लागतो. मुलीसोबत घडलेल्या भयंकर घटनेनंतर रवी तेजाची व्यक्तिरेखा पेटून उठते. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तो कोणत्याही थराला जाण्यास तयार होतो. चित्रपटातील थरारक प्रसंग आणि बाप-मुलीमधील भावनिक नातं विशेष लक्ष वेधून घेतं.
दोन्ही चित्रपटांमधील समान धागा काय?
दोन्ही चित्रपटांच्या कथा वेगळ्या असल्या तरी त्यांना जोडणारा समान धागा म्हणजे बाप आणि मुलीमधील अतूट नातं. मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर वडिलांची असलेली साथ, तिच्यासाठी होणारी धडपड आणि तिच्या आनंदासाठी घेतले जाणारे प्रयत्न या दोन्ही चित्रपटांत पाहायला मिळतात. विशेषतः मुलीला पहिली मासिक पाळी आल्यानंतर घरात निर्माण होणारे वातावरण आणि त्यानिमित्ताने कार्यक्रम करण्यासाठी कुटुंबीयांची सुरू असलेली धावपळ हे प्रसंगही भावनिक पद्धतीने दाखवण्यात आले आहेत. बाप-मुलीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि संघर्ष अनुभवायचा असेल, तर हे दोन्ही चित्रपट पाहण्यासारखे आहेत. थरार, भावना आणि कौटुंबिक नात्यांची सुंदर गुंफण असलेले हे चित्रपट Netflix वर पाहू शकता.




