The Portal of Force : दिशाची हॅालिवूडमध्ये एन्ट्री! नवीन चित्रपटाची झलक समोर
The Portal of Force : या चित्रपटात हॅालिवूडमधील केविन स्पेसी, टायरेस गिब्सन आणि डॉल्फ लुंडग्रेन यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

The Portal of Force : बॅालिवूडमधील काही कलाकारांना हॅालिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळते. अशीच एक संधी अभिनेत्री दिशा पटानीला मिळाली आहे.
अभिनेत्री दिशा पटानी एका हॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘द पोर्टल ऑफ फोर्स’ असून, हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, दिशाची झलक ट्रेलरमधून दाखवण्यात आली आहे.
या चित्रपटात हॅालिवूडमधील केविन स्पेसी, टायरेस गिब्सन आणि डॉल्फ लुंडग्रेन यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. लाडो ओखोटनिकोव्ह यांनी तयार केलेल्या ‘स्टॅटिगार्ड्स व्हर्सेस हॉलिगार्ड्स’ या नवीन सिनेमॅटिक युनिव्हर्समधील हा पहिला भाग आहे.
या चित्रपटात दिशाने जेसिकाची भूमिका साकारली आहे, जी स्टॅटिगार्ड्स आणि हॉलिगार्ड्स या दोन प्राचीन गटांमध्ये अडकलेली आहे.
दोन गटांमधील दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाभोवती चित्रपटातील कथा फिरते, ज्यात जेसिकाला ‘द चोझन वन’ (निवडलेली व्यक्ती) म्हणून चित्रित केलेले आहे.
चित्रपटाच्या मूळ कथानकानुसार, जेसिका युद्धाचे तसेच मानवतेचे भवितव्य ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
केविन स्पेसी दिग्दर्शित हा चित्रपट दोन दशकांहून अधिक काळानंतर दिग्दर्शनात त्यांचे पुनरागमन दर्शवतो. चित्रपट निर्मात्यांच्या मते हा दोन विरोधी प्राचीन शक्तींमधील एका गुप्त युद्धावर आधारित एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे.
दिशा पटानी बॅालिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून, अनेक चित्रपटात ती अॅक्शन करताना दिसली आहे. हॅालिवूड चित्रपटात ती दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांना मोठी उत्सुकला लागलेली आहे.
‘द पोर्टल ऑफ फोर्स’ चित्रपटाचा ट्रेलर समोर आला असला तरी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, ट्रेलरच्या शेवटी कमिंग सुन २०२६ असे लिहिलेले दिसते. त्यामुळे हा चित्रपट याच वर्षी रिलीज होईल अशी शक्यता आहे.
दरम्यान, ‘द पोर्टल ऑफ फोर्स’ हॉलिवूड चित्रपटांची दारं खुली करणार चित्रपट ठरू शकतो. हे तिचे हॅालिवूडमधील पदार्पण समजले जाते. याशिवाय दिशा आगामी बॉलिवूड चित्रपट “अवारापन २” मध्येही दिसणार आहे.



