Pune District : ढगाळ हवामानामुळे गव्हाच्या पिकावर रोगराई

लाखणगाव: आंबेगाव तालुक्यात गव्हाची पेरणी करून एक महिना झाला असून गव्हाचे पीक जोमदार पद्धतीने वाढले आहे. परंतु हवामानात झालेला बदल आणि ढगाळ हवामानामुळे गव्हाच्या पिकावर रोगराई येऊन उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंचर, अवसरी, रांजणी, निरगुडसर, घोडेगाव, काठापूर बुद्रुक, लाखणगाव, देवगाव, पोंदेवाडी ,पारगाव, शिंगवे, खडकवाडी या परिसरामध्ये गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. एक महिन्यापूर्वी विविध गावांमधील शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली होती.गव्हाचे पीक एक महिन्याचे झाले असून खुरपणी करून झाली आहे. गहु पीक वाढीच्या अवस्थेत असून अचानक वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वातावरणाचा फटका गव्हाच्या पिकावर होणारा असून गव्हावर तांबेरा व इतर प्रकारचे रोग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या रोगराईचा फटका गव्हाच्या उत्पादनावर होणार आहे.
सध्यातरी गहू जोमदार पद्धतीने वाढला असून ढगाळ वातावरणामुळे येणारी रोगराई थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या कराव्या लागत आहे. गव्हाचे उत्पादन आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणावर घेतले जायचे.परंतु शासनाने रेशनिंगवर गहू उपलब्ध केल्यानंतर या परिसरात गव्हाचे उत्पादन कमी प्रमाणात होऊ लागले आहे. गहू चांगल्या स्थितीत असून रोगराई पासून गव्हाचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.





