शिरूर तहसील कार्यालयात पुन्हा बिदागीची चर्चा? ; सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी, शेतकरी हतबल

शिरूर (अरुणकुमार मोटे) – शिरूर तहसील कार्यालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांची विविध कामे प्रलंबित असल्याची तक्रार वारंवार समोर येत आहे. यामुळे कामांच्या विलंबाबाबत नाराजी वाढत असून, काही नागरिकांनी निवासी नायब तहसीलदार यांच्या कामकाजाबाबत शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही प्रकरणांमध्ये फाईल मंजुरीसाठी अतिरिक्त अडथळे निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीही या कार्यालयात भ्रष्टाचारासंदर्भात काही घटना घडल्याचे समोर आले होते. त्यामुळे प्रशासनाने अशा बाबींकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असून, शेत रस्ते आणि पानंद रस्ते उघडण्यासाठीही विशेष लक्ष देत आहेत. मात्र, कार्यालयातील काही कामांबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्याने त्यावर प्रशासनाने त्वरित तपासणी करावी, अशी स्थानिक स्तरावर मागणी होत आहे.
यासंदर्भात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.





