Election News – भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरमध्ये नाराजी सत्र सुरू असल्याचे चित्र आहे. पक्षातील 40 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे दिसत आहे. तर अनेकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष उभे राहून बंडखोरीही केल्याचे दिसत आहे. नागपूर महानगरपालिकेसाठी सुनील अग्रवाल यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रभाग 14 मधील सुमारे भाजपच्या 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच, प्रभाग क्रमांक14 मधून उमेदवारी न मिळाल्याने तब्बल सहा टर्म नगरसेवक राहिलेले सुनील अग्रवाल यांनी बंडखोरी करत याच प्रभागातून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांनी तीन वेळेला अपक्ष, तर तीन वेळेला भाजपमधून त्यांनी नगरसेवक पद भूषवले आहे. मात्र, यंदा पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही आणि त्यांच्या जागी भाजपच्या महिला नगरसेविका प्रगती पाटील यांना संधी देण्यात आली. प्रभाग 16 चे पदाधिकारी गजानन निशीतकर यांनी ही प्रभागात बाहेरचा उमेदवार दिल्याने पक्षाचा राजीनामा दिला. माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनीही राजीनामा दिला आहे. प्रभाग 27 मधून भाजपचे माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार, तर प्रभाग 33 मधून गोलू बोरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.