Narendra Modi : एकीकडे आपत्ती, दुसरीकडे मोदी गॅरंटी; भाजप दिल्ली जिंकेल मोदींनी व्यक्त केला विश्वास

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजप दिल्ली जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी दिल्लीतील आप विरूद्ध भाजप लढतीचा उल्लेख एकीकडे आपत्ती, तर दुसरीकडे मोदी गॅरंटी असल्याच्या शब्दांत केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचारासाठी आयोजित सभेत मोदी बोलत होते. केंद्रीय अर्थसंकल्पाने प्रत्येक कुटूंबाला खुष केले आहे. देशाच्या इतिहासातील आमच्यासाठीचा सर्वांत अनुकूल अर्थसंकल्प असे त्याचे वर्णन मध्यमवर्गाकडून केले जात आहे. एवढा मोठा करदिलासा मध्यमवर्गाला कधीच मिळाला नव्हता, असे ते म्हणाले.
दिल्लीतील सत्तारूढ आपचा उल्लेख पुन्हा आपत्ती म्हणून करत मोदींनी जोरदार टीकास्त्र सोडले. देशाच्या राजधानीची ११ वर्षे आपत्तीने उद्धवस्त केली. आप सरकारमुळे दिल्लीला मोठी किंमत मोजावी लागली. त्यामुळे आपत्तीमुक्त होण्याचा निर्णय दिल्लीने घेतला आहे. आपचे अनेक नेते तो पक्ष सोडत आहेत. दिल्लीकरांच्या रोषाची जाणीव त्यांना झाली आहे, असा दावा मोदींनी केला. पुन्हा उमेदवारी न मिळालेल्या आपच्या ८ आमदारांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचा संदर्भ मोदींनी दिला.





