Devendra Fadnavis : महायुतीत स्थानिक पातळीवर मतभेद; CM फडणवीसांचा प्रमुख नेत्यांना थेट इशारा, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Devendra Fadnavis : या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीमधील इतर अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.

Mahayuti Coordination Meeting : राज्य पाताळीवर महायुती सरकारचा कारभार सुरू असला तरी स्थानिक पातळीवर मोठी धुसफूस होत असल्याची चर्चा सातत्याने होत असते. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अंतर्गत वाद आणि मतभेद होत असल्याचे नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन दिसते. या पार्श्वभूमीवर काल महायुती सरकारची समन्वय समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीमधील इतर अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.
महायुतीच्या नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. ही बैठक पार पडल्यानंतर महायुतीत समन्वय राखण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील रखडलेली महामंडळे आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. वारंवार सूचना देऊनही महायुतीमधील पक्षांमध्ये स्थानिक स्तरावर सातत्याने धुसफूस सुरु असल्याने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रमुख नेत्यांना सक्त ताकीद दिली असल्याची माहिती आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती
स्थानिक स्तरावर महायुतीमध्ये पूर्ण समन्वय राखण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. महायुतीतील कोणत्याही आमदार किंवा खासदाराने एकमेकांच्या नेत्यांवर अथवा पक्षांवर सार्वजनिक टीका करू नये, अशा कडक सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत, अशी महत्वाची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
‘हा’ महत्वाचा निर्णय
जिल्हास्तरावर डीपीडीसीच्या निधी वाटपावरुन महायुतीमधील नेत्यांचे खटके उडल्याचे अनेकदा दिसले आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद उद्भवतील, तिथे सर्वप्रथम विभागीय आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तोडगा न निघाल्यास समन्वय समितीच्या पातळीवर निर्णय घेतला जाईल. यानंतरही जर तिढा सुटला नाही तर अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतला जाईल.
महामंडळावर लवकरच तोडगा
महामंडळांच्या अंतिम फेरबदलासाठी आणि वाटपासाठी अजून बैठका होऊन पुढील १५ दिवसांत महामंडळ वाटपावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. कोणते महामंडळ कुठल्या पक्षाला? यावर आणखी दोन बैठका होऊन तिढा सोडविला जाणार आहे.






