Rahul Gandhi: राहुल गांधींचे फडणवीसांना थेट पत्र; आदिवासी विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील अपमानास्पद नियम व प्रेग्नेंसी टेस्टचा मुद्दा
Rahul Gandhi: पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमात विद्यार्थिनींनी मांडलेल्या व्यथा

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी गेल्या १० दिवसांहून अधिक काळापासून आपल्या हक्कांसाठी, काही नियमांविरोधात उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्र्यांना या विद्यार्थ्यांची वैयक्तिकरीत्या भेट घेण्याची विनंती राहुल गांधी यांनी पत्र लिहीत केली आहे.
वसतिगृहांच्या नियमांवर उपस्थित केले प्रश्न
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेलं पत्र आणि विद्यार्थ्यांचे निवेदन शेअर केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचाही उल्लेख केला. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी वसतिगृहांशी संबंधित समस्या मांडल्याचे त्यांनी सांगितले.
वसतिगृहांमध्ये ३० वर्षांची वयोमर्यादा
विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, वसतिगृहांमध्ये ३० वर्षांची वयोमर्यादा लागू करण्यात आली आहे. याशिवाय असे अनेक नियम आहेत, ज्यांना त्यांनी अपमानास्पद म्हटले आहे.
या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि भविष्यातील तयारीवर परिणाम होऊ शकतो. अनेक आदिवासी विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करतायत किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत मात्र 30 वर्षांपेक्षा जास्त वय झाल्यास त्यांना वसतिगृहात राहता येणार नाही.
दुर्गम आणि ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणारे अनेक आदिवासी विद्यार्थी सरकारी वसतिगृहांवरच अवलंबून असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय मोठी अडचण निर्माण करणारा ठरू शकतो, असं राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे.
वैद्यकीय चाचण्यांवर गंभीर आक्षेप
राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींसाठी करण्यात येणाऱ्या काही वैद्यकीय चाचण्यांवरही गंभीर आक्षेप घेतला आहे. मोठ्या सुट्टीनंतर वसतिगृहात परतणाऱ्या विद्यार्थिनींना त्यांची ‘फिटनेस’ सिद्ध करण्यासाठी प्रेग्नेंसी टेस्टसह इतर वैद्यकीय चाचण्या कराव्या लागत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी,
महाराष्ट्र के अनेक आदिवासी छात्र 10 दिनों से अधिक से अपने अधिकारों के लिए भूख हड़ताल पर हैं।
पुणे में ‘छात्रों की गूंज’ के दौरान छात्राओं ने बताया कि छात्रावासों में 30 वर्ष की अनावश्यक उम्र सीमा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधाएं और महिलाओं के लिए… pic.twitter.com/mzoIrscyYD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 24, 2026
हा नियम विद्यार्थिनींच्या सन्मान आणि प्रतिष्ठेवर आघात करणारा आहे. विद्यार्थिनींना सुरुवातीपासूनच संशयाच्या नजरेने पाहून त्यांना दोषी असल्यासारखी वागणूक देणं अपमानास्पद असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
याशिवाय अनेक ठिकाणी वसतिगृह सुरक्षित नसून विद्यार्थ्यांना पुरेसं आणि चांगलं अन्न मिळत नाही. स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांचीही मोठी कमतरता आहे. शिक्षणासाठी शहरात आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना सुरक्षित वसतिगृह आणि योग्य सुविधा मिळणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक भेटीची मागणी
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक भेट घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील, अशी अपेक्षा त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
याद्वारे राहुल गांधी यांनी पुण्यातील कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सांगितलेल्या, वसतिगृहांमध्ये ३० वर्षांची अनावश्यक वयोमर्यादा, अपमानास्पद नियम, असुरक्षित परिस्थिती आणि महिलांसाठी गर्भधारणा चाचणीसारख्या अमानवी तरतुदी या मुद्यांकडे लक्ष वेधले आहे. यावर आता मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा:






