पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करावी; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई : राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी वादगस्त ठरलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. आमागी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेसने याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र पोलिस महासंचालकपदी कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला या अत्यंत वादग्रस्त अधिकारी आहेत.
शुक्ला यांची सेवा जून २०२४ रोजी समाप्त झाली असतानाही भाजपा युती सरकारने जानेवारी २०२६ पर्यंत त्यांना नियमबाहय बढती दिली. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होतील. या निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी वादग्रस्त पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.
रश्मी शुक्ला १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून सध्या पोलिस महासंचालक पदाबरोबरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अतिरिक्त पदभारही त्यांच्याकडेच आहे. शुक्ला यांच्या जून १९६४ या जन्मतारखेनुसार त्या जून २०२४ मध्ये सेवानिवृत्त होतात; पण महाराष्ट्र पोलिस कायद्याचे थेट उल्लंघन करून त्यांना बेकायदेशीरपणे जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांचा कार्यकाळ २ वर्ष किंवा त्यांच्या निवृत्तीपर्यंत असा आहे. या बेकायदेशीर मुदतवाढीच्या व्यतिरिक्त रश्मी शुक्ला यांचा बेकायदेशीर कृत्यांचा इतिहास आहे. शुक्ला यांचा आतापर्यंतचा इतिहास पाहता त्यांची निष्पक्षता आणि प्रामाणिकपणाबद्दल गंभीर चिंता वाटते, असे पत्रात म्हटले आहे.
रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास आणि धमक्या देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. अनेकदा खोटे गुन्हे दाखल केले आहेत. रश्मी शुक्ला या भाजपासाठी राजकीय प्रचारक म्हणून काम करीत आहेत. रश्मी शुक्ला यांनी विरोधी पक्षनेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रात भाजपा सत्तेत आल्यावर त्यांच्यावरील कारवाई रखडली आहे. एक वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी त्यांच्या भूमिकेतील सचोटी आणि पक्षपाती स्वभावाशी तडजोड केल्याची टीका त्यांनी पत्रात केली आहे.





