पुणे, [प्रभात वृत्तसेवा] – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काही दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होत्या. पण, त्यांच्या प्रवास मार्गावरील खड्ड्यांबाबत राष्ट्रपती कार्यालयाने थेट नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रवास मार्गातील खड्डे कोणी दुरुस्त करायचे, यावरून पीएमआरडीए आणि पुणे महापालिका यांच्यात वाद झाले. त्यामुळे खड्डे तसेच राहिले. परिणामी, राष्ट्रपती कार्यालयाने याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे पोलिसांनी महापालिकेस कळविले आहे. तर, आता २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असून, त्यांच्या प्रवास मार्गावरील खड्डे तातडीने दुरूस्त करावेत, अशा सूचना पालिकेस करण्यात आल्या आहेत. शहरात यंदा जून अखेरीस आणि जुलैमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली. प्रत्यक्षात महापालिकेकडून शहरात विविध योजनांसाठी सुरू असलेले खोदकाम तसेच पाऊस यामुळे खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था झाली. यानंतर पावसाळ्याआधी रस्ते दुरुस्ती होणे आवश्यक होते. मात्र, ते कामही तकलादू झाले. त्यावेळीही पावसाचे प्रमाणही अधिक होते. त्यामुळे खड्ड्यांची संख्या पुन्हा वाढली. पाऊस थांबतच नसल्याने रस्ते दुरुस्ती रखडली. दरम्यान, दि. २ आणि ३ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु पुणे दौऱ्यावर होत्या. पुण्यातील राजभवनला त्यांचा मुक्काम होता. तिथून कार्यक्रमांसाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जातांना राष्ट्रपतींच्या ताफ्यातील वाहनांना पुण्यातील खड्ड्यांचा मोठा त्रास झाला. त्यामुळे आता मनपा पथ विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता तरी रस्ते चांगले ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार असल्याने रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत यासाठी ले आहे. स्वारगेट ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला पुण्यात येणार आहेत. त्यामुळे राष्ट्रपती कार्यालयाने व्यक्त केलेली नाराजी पाहता पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी “विनंती’ पुणे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत केली आहे. पण, झाल्या प्रकारामुळे “स्मार्ट सिटी’चा टेंभा मिरवणाऱ्या महापालिकेच्या कारभाराची पोलखोल झाली आहे.