Water Scarcity – खेड आणि शिरूर तालुक्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या चासकमान धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून धरणात सध्या अवघा १८.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. प्रचंड उष्णता, वाढलेले बाष्पीभवन आणि शेतीसाठी वाढता पाण्याचा वापर यामुळे आगामी काळात दोन्ही तालुक्यांवर गंभीर जलसंकटाचे सावट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाने उशीर केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ८.५४ टीएमसी क्षमतेचे चासकमान धरण खेड व शिरूर तालुक्यातील सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचा मुख्य आधार आहे. सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून ५६० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून भाजीपाला, ऊस, फळबागा आणि उन्हाळी पिकांसाठी हे पाणी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. मात्र तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने पिकांना वारंवार पाणी द्यावे लागत असून धरणातील साठा वेगाने कमी होत आहे. धरणालगतच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. चासकमान धरणातून Bhima River पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर अनेक गावांचा पिण्याचा व शेतीचा आधार आहे. चासकमान : खेड-शिरूर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या धरणातील पाणीसाठा १८ टक्क्यांवर. भिमा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये साठवले जाणारे पाणी उन्हाळ्यात गावांसाठी जीवनदायी ठरते. मात्र सध्याची घटती पातळी पाहता प्रशासनासमोर पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तालुक्यातील इतर धरणांची स्थिती तुलनेने समाधानकारक असली तरी चिंता कायम आहे. आजच्या स्थितीनुसार भामा आसखेड धराणाणत ४६.१० टक्के तर कळमोडीमध्ये ७४.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच काळात चासकमान धरणात केवळ ९.४९ टक्के पाणीसाठा होता. यंदा साठा तुलनेने जास्त असला तरी वाढत्या उष्णतेमुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साठा अधिक असला तरी तीव्र उन्हामुळे पाण्याचा वापर झपाट्याने वाढत आहे. दीर्घकालीन नियोजनाची गरज सध्या चासकमान धरणातून खेड-शिरूर भागासाठी ५९० क्युसेक वेगाने तर भामा आसखेड धरणातून एक हजार क्युसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. उन्हाळी पिके आणि पिण्याच्या गरजा भागवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, “पावसाळा वेळेत सुरू झाला नाही तर यंदा मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते,” अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनाने तातडीने दीर्घकालीन नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.