Dimbhe Dam: गतवर्षीच्या तुलनेत डिंभे धरणात मोठा उलटफेर; पाहा जलसंपदा विभागाचा धक्कादायक अहवाल
Dimbhe Dam: पावसाळ्याची सुरुवात होऊनही डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोरड; आंबेगाव तालुका आणि परिसरातील सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे.

Dimbhe Dam – आंबेगाव तालुका तसेच परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि सिंचनासाठी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) धरणातील जलसाठा अत्यंत कमी झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.पावसाळ्याला सुरुवात होऊनही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठा केवळ ४.६५ टक्क्यांवर स्थिर आहे.
गतवर्षी २ जुलै रोजी डिंभे धरणात ४२.६१ टक्के जलसाठा उपलब्ध होता. मात्र, यंदा याच दिवशी हा साठा केवळ ४.६५ टक्क्यांवर घसरला आहे. भविष्यातील पाणी नियोजनाचे आव्हान अधिक गंभीर झाले आहे.गेल्या वर्षी मे व जून महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली होती. यंदा मात्र, पावसाने ओढ दिल्याने धरणात नवीन पाणी येत नसून उपलब्ध साठ्यावरच सर्व व्यवस्था सुरू आहे.
या परिस्थितीमुळे पिण्याच्या पाणीपुरवठ्यासह शेती आणि सिंचन व्यवस्थेवर आगामी काळात ताण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी धरणातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जोरदार आणि सातत्यपूर्ण पाऊस होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता पावसाकडे लागले असून वेळेवर पाऊस झाल्यासच डिंभे धरणाला दिलासा मिळणार आहे.अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधिकारी दत्तात्रय कोकणे यांनी दिली.
पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची गरज
डिंभे धरणातील साठा गतवर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे.धरणात पाण्याची आवक वाढण्यासाठी पाणलोट क्षेत्रात सातत्याने आणि चांगला पाऊस होणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी सांगितले





