Diliptatya Patil : जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावे; दिलीपतात्यांची अपेक्षा, अमोल कोल्हेंकडून निष्ठेचा गौरव
Diliptatya Patil : ईश्वरपुरात दिलीपतात्या पाटील यांच्या सत्कार व आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात अमोल कोल्हे यांनी त्यांच्या निष्ठेचा गौरव केला. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा दिलीपतात्यांनी व्यक्त केली.

Diliptatya Patil : (ईश्वरपूर) – कृष्णेच्या पाण्यात आणि वाळव्याच्या मातीत अनेक नररत्ने घडली. त्यापैकी दिलीपतात्या पाटील हे एक असून, त्यांनी निष्ठा आणि तत्त्वांशी तडजोड न करता ५२ वर्षे राजकीय व सामाजिक जीवनात वाटचाल केली. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार समाजात पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. दिलीपतात्या हे निष्ठेचे दीपस्तंभ आहेत, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी केले.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार आणि ‘फिडेल’ आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार रोहित पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक, अजित घोरपडे, प्रतिक पाटील, राजवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार कोल्हे म्हणाले, “मेंदूत विचार आणि मनात धाडस निर्माण झाले की व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची ताकद मनगटात येते. मन, मेंदू आणि मनगट शाबूत ठेवले तर राज्य व देशही शाबूत राहतो.” कर्मामध्ये देव मानणे आणि कर्मकांडाला फाटा देणे हे पांडुरंगाने शिकवले असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार जयंत पाटील म्हणाले की, निष्ठावंत माणसाला मोठी किंमत असते. कृष्णेच्या पाण्यातच संघर्ष करण्याचे बाळकडू आहे. संघर्षाच्या काळात दिलीपतात्यांनी कायम पुढे राहून लढा दिला. समोरचा कितीही मोठा असला तरी त्यांनी कोणाची पर्वा केली नाही. त्यांना फार काही देता आले नसले तरी त्यांनी निष्ठेने आणि प्रभावीपणे काम केले.
शशिकांत शिंदे म्हणाले, दिलीपतात्यांनी राजारामबापूंना खंबीर साथ दिली. मिळालेल्या प्रत्येक पदाला त्यांनी प्रामाणिकपणे न्याय दिला. त्यांनी राजकारणातून निवृत्त होऊ नये; आजही पक्षाला आणि समाजाला त्यांची गरज आहे. तात्यांचा निष्ठेचा आदर्श जयंत पाटील यांनी घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार रोहित पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना दिलीपतात्या पाटील म्हणाले, “५२ वर्षे राजकारण आणि समाजकारणात निष्ठा राखली. अनेक स्थित्यंतरे पाहिली. त्यातील सर्व आत्मचरित्रात लिहिले तर स्टेजवरील निम्मे घरी जातील.” राजारामबापूंच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला अंगावर घेण्याचे काम अनेक वर्षे केले असून, कधीही कोणाची फिकीर केली नाही, असे त्यांनी सांगितले. राजकारणातून निवृत्त झालो असलो तरी कोणावर अन्याय झाला तर त्याच्यासाठी धावून जाण्यास सदैव तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, महेंद्र लाड, देवराज पाटील, उदयसिंह पाटील, अभिजित पाटील, पी.आर. पाटील, शामराव पाटील, आनंदराव मलगुंडे, विशाल शिंदे, खंडेराव जाधव, शहाजी पाटील उपस्थित होते. आर.डी. सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संग्रामसिंह पाटील यांनी आभार मानले.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावे –
राजारामबापूंचे घर सोडायचे नाही, हा शब्द वडिलांनी दिला होता आणि तो आजअखेर पाळत असल्याचे दिलीपतात्या पाटील यांनी सांगितले. राजारामबापूंनी मुख्यमंत्री व्हावे, ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. आता जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी वाळवा तालुक्याची अपेक्षा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘दिलीपतात्या निवृत्त होता कामा नये’ –
निष्ठा, तत्त्व आणि विचाराने चालणारी माणसे कमी झाली आहेत. दिलीपतात्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय स्वतःच घेतला असला तरी त्यांच्या निवृत्तीवर पक्षात फुली मारावी लागेल. आजही मनाने युवा असलेले दिलीपतात्या निवृत्त होता कामा नयेत; त्यांची सर्वांना गरज आहे, असे स्पष्ट मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.





