सोलापूर : सोलापूरचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. भाजपचे कार्यकर्ते सोलापुरातील भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत. घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत अशा आशयाची फेसबुक पोस्ट एका भाजप कार्यकर्त्याने केली आहे. आम्ही रक्ताचे पाणी करून या लोकांशी संघर्ष केला, मात्र हेच लोक आता आमच्या डोक्यावर बसणार असतील तर ते चुकीचे आहे.आम्ही आयुष्यभर संघर्ष केला, लाठ्या काठ्या झेलल्या आणि तेच लोक ऐनवेळी पक्षात येत असतील तर कसे होणार. भाजपमध्ये दिलीप माने यांचा प्रवेश मान्य नाही, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पोहोचल्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कलंकित नेत्यांना प्रवेश नको अशी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ सुरु केला, त्यानंतर रोहिणी तडवळकर यांनी सर्वांची समजूत घातली आणि सर्वांची निवेदने घेतली आहेत. भाजपची भूमिका स्पष्ट आहे, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या समवेत या सर्व गोष्टींची चर्चा होऊन हे निर्णय होत असतात. त्यामुळे शहराचा फार मोठा सहभाग नसतो. जेव्हा अशा मोठ्या नेत्यांच्या पक्षप्रवेश पक्ष करत असतो तेव्हा पार्टीने त्यांच्या हिताचा काहीतरी निर्णय घेतलेला असतो. पार्टीने या संदर्भात काहीतरी बेरजेचे राजकारण केलेले असेल. याबाबत माझी आणि बापूंची चर्चा झालेली आहे. पालकमंत्र्यांची चर्चा झाली आहे. प्रदेशाध्यक्षांनी बापूंशी चर्चा करून या बाबतीमध्ये ते नक्की निर्णय घेतील.सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री विचार करून निर्णय घेतील असे मला विश्वास आहे, असे भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सांगितले आहे.