सोशल मीडिया अकाउंट उघडण्यासाठी मुलांना घ्यावी लागणार पालकांची मंजूरी, लवकरच येणार नवीन नियम

Digital Personal Data Protection Rules: सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. याचे काही दुष्परिणाम देखील पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातली आहे. त्यातच आता भारतात देखील लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरण्यावर काही प्रतिबंध येण्याची शक्यता आहे.
18 वर्षांखालील लहान मुलांना आता सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी घेणे आवश्यक असेल. डेटा प्रोटेक्शन 2025 ( Digital Personal Data Protection Rules, 2025) च्या नवीन मसुद्यामध्ये या नियमांचा उल्लेख आहे. यामुळे कंपन्यांना पालकांची मंजूरी मिळत नाही तोपर्यंत लहान मुलांच्या डेटाचा वापर अथवा स्टोर करता येणार नाही.
केंद्र सरकारने यासंदर्भातील मसूदा जारी केला असून, लोकांकडून यावर हरकती मागवल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) याबाबत mygov.in या वेबसाइटवर नागरिकांना सूचना अथवा हरकती पाठवण्यास सांगितल्या आहेत. मसुद्यातील नियमांवर 18 फेब्रुवारीनंतर विचार केला जाणार आहे. तसेच, काही नवीन सूचना असल्यास त्यात बदल केला जाईल.
केंद्र सरकारच्या मसुद्यानुसार, लहान मुलांचा डेटा स्टोर करण्यासाठी आधी कंपन्यांना परवानगी घ्यावी लागेल. जी व्यक्ती मुलांच्यावतीने परवानगी देत आहे, त्याची ओळख पटवणे गरजेचे असेल. तसेच, जेवढ्या कालावधीसाठी मंजूरी देण्यात आली आहे, तेवढ्याच कालावधीसाठी डेटा स्टोर केला जाईल. त्यानंतर हा डेटा डिलीट केला जाईल. डेटासंदर्भातील संपूर्ण जबाबदारी ही ई-कॉमर्स, सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्म्सची असेल.
दरम्यान, 2023 मध्ये संसदेने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायद्याला मंजूरी दिली आहे. या अंतर्गत कंपन्या भारतीय नागरिकांचा डेटा देशाबाहेर स्टोर करू शकत नाही. तसेच, नियमांचे उल्लंघन झाल्यास कंपन्यांकडून दंड देखील आकारला जाईल.





