NCP News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP News) अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडून पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या (NCP News) राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार यांनी २८ जानेवारीनंतर (अजित पवारांच्या निधनानंतर) पक्षाकडून झालेला कोणताही पत्रव्यवहार (NCP News) ग्राह्य धरू नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. या पत्रामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची कोंडी झाली असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता याच पत्राच्या परिणामस्वरूप सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रीय अध्यक्षपद आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांची राज्यसभा खासदारकी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय सूत्रांमध्ये रंगली आहे. Sunetra Pawar पत्रात नेमके काय? सुनेत्रा पवार यांच्या सहीने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रात २८ जानेवारीनंतर निवडणूक आयोगासोबत झालेला सर्व पत्रव्यवहार रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रात सुनेत्रा पवार यांनी स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख केला असून, पक्षातील इतर काही प्रमुख नेत्यांच्या पदांचा उल्लेख टाळल्याचे दिसते. पत्रात फक्त सुनेत्रा पवार (राष्ट्रीय अध्यक्ष) आणि शिवाजीराव गर्जे (खजिनदार) यांचाच उल्लेख असल्याचे समोर आले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठी कार्यकारिणी बैठकीसंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. मात्र सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रामुळे २८ जानेवारीनंतर झालेल्या सर्व प्रक्रिया आणि नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवारांची खासदारकी अडचणीत? सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्या राज्यसभा खासदारकीसाठी (एबी फॉर्म) प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सह्या आहेत. जर सुनेत्रा पवार यांच्या पत्रानुसार २८ जानेवारीनंतरचा सर्व पत्रव्यवहार रद्द झाला, तर या फॉर्मची वैधता देखील प्रश्नांकित होऊ शकते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदासोबतच पार्थ पवार यांची खासदारकी देखील धोक्यात येण्याची दाट शक्यता असल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत. पक्षातील अंतर्गत संघर्ष अजित पवारांच्या निधनानंतर (२८ जानेवारी २०२६) फक्त १८ दिवसांत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर नेत्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पक्ष संविधानात बदल करून कार्याध्यक्ष पदाला अधिक अधिकार देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप राष्ट्रवादीतील काही नेत्यांकडून करण्यात आले आहेत. या पत्रात सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा बहुसंख्य आमदारांना विश्वासात घेतल्याचे दिसत नाही. सुनेत्रा पवार यांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्यानंतर १० मार्च २०२६ रोजी हे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले होते. या पत्रामुळे पक्षातील तटकरे-पटेल गट आणि पवार कुटुंबीयांमधील मतभेद अधिक स्पष्ट झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर या पत्राची जोरदार चर्चा सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. पक्षातील विविध गटांकडून यासंदर्भात वेगवेगळी प्रतिक्रिया येत आहेत. मात्र अद्याप निवडणूक आयोगाकडून यावर कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.