Digital Arrest – वानवडी येथील ८६ वर्षीय निवृत्त बँक व्यवस्थापकाला आरोपींनी स्वतःला मुंबई पोलीस दलातील अधिकारी असल्याचे भासवत संपर्क साधला. त्यांच्या नावावरून बँक खाते वापरून मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप करीत, कुलाबा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची खोटी माहिती देण्यात आली. अटक टाळायची असेल तर तपासासाठी रक्कम सुरक्षित खात्यात जमा करा, असा दम देत आरोपींनी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एक कोटी २७ लाख ५३ हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांत वळते केले. विशेष म्हणजे, तक्रारदाराच्या दोन मुली शेजारीच राहत असूनही ‘ही बाब कोणालाही सांगितल्यास तत्काळ अटक होईल’ अशी भीती दाखवून चोरट्यांनी त्यांना पूर्णपणे एकाकी केले. काही दिवस वडिलांच्या वागण्यात बदल जाणवल्यानंतर मुलींनी चौकशी केली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. दरम्यान, एरंडवणे परिसरातील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकालाही अशाच पद्धतीने जाळ्यात ओढण्यात आले. आरोपींनी स्वतःला डेटा प्रोटेक्शन संस्थेचे अधिकारी सांगत त्यांच्या आधार कार्डचा वापर करून अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याची खोटी तक्रार असल्याचे सांगितले. सायबर क्राईम पुढे तर त्यांचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आणि प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याचा बनाव करण्यात आला. ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली व्हिडीओ कॉलवर नजर ठेवत, कोणाशीही संपर्क साधू न देण्याची सक्ती करण्यात आली. भीतीच्या छायेत ठेवून विविध खात्यांतून दोन कोटी एक लाख ९० हजार २४७ रुपये जमा करून घेण्यात आले. सायबर तज्ज्ञांच्या मते, ‘डिजिटल अरेस्ट’ ही संकल्पना पूर्णपणे बनावट असून कोणतीही सरकारी यंत्रणा व्हिडीओ कॉलवर अटक किंवा तपास करीत नाही. तरीही गुन्हेगार नियोजनबद्ध पद्धतीने कायद्याची भीती, सामाजिक बदनामी आणि कुटुंबीयांपासून तोडण्याची रणनीती वापरून ज्येष्ठांना मानसिक जाळ्यात अडकवतात. सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पोलिस, सीबीआय, डेटा प्रोटेक्शन किंवा न्यायालयाच्या नावाने येणाऱ्या कोणत्याही धमकीवजा कॉलवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद कॉल आल्यास तत्काळ १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. ‘तुमच्यावर मनी लाँडरिंगचा गुन्हा आहे. सुप्रीम कोर्टात केस आहे. लगेच अटक होईल!’ अशा शब्दांत फोनवरून धमकी देत सायबर चोरट्यांनी पुण्यातील दोन ज्येष्ठ नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीत ठेवून तब्बल साडेतीन कोटींहून अधिक रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.