कर्नाटक कॉंग्रेसपुढे अवघड आव्हान; विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 300 जण इच्छुक

बेंगळुरू – कर्नाटक राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या एकूण ११ जागांसाठी पक्षात ३०० हून अधिकअधिक इच्छुक असल्याने पक्षाच्या नेत्यांपुढे “कठीण स्थिती” निर्माण झाली आहे असे उपमुख्यमंत्री व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार, यांनी म्हटले आहे. या प्रकरणी पक्ष श्रेष्ठीच निर्णय घेणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक १३ जून रोजी होणार आहे. विधानसभेतील पक्षांच्या विद्यमान संख्याबळानुसार काँग्रेस ७ जागा, भाजप तीन आणि जद( एस) एक जागा जिंकू शकते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि शिवकुमार आज नवी दिल्लीला काँग्रेस हायकमांडशी उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी रवाना झाले आहेत.
एमएलसी निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. आणि ती ३ जूनपर्यंत चालणार आहे. शिवकुमार म्हणाले ३०० हून अधिक इच्छुक आहेत, ते सर्व विभागातील आहेत. सात जागांसाठी सर्व विभागांना सामावून घेणे शक्य नाही. या सर्वांनी पक्षासाठी काम केले आहे, असे शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पक्षापुढे उमेदवार निवडीची कठीण स्थिती आहे, पण पक्षश्रेष्ठीच या बाबत योग्य ते निर्णय घेतील असे ते म्हणाले.





