Abhishek Bachchan : फिल्मफेअर पुरस्कार जिंकला नाही, तर खरेदी केला.! अभिषेकने ट्रोलर्सला चांगलंच सुनावलं, थेट म्हणाला…

Abhishek Bachchan : अभिनेता अभिषेक बच्चनने ‘आय वाँट टू टॉक’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला आहे. मात्र एका युजरने सोशल मीडियावर अभिषेकवर मोठा आरोप केला आहे. त्याने हा पुरस्कार जिंकला नाही तर खरेदी केला, असा आरोप संबंधित युजरने केला आहे. यावर अभिषेकने सडेतोड उत्तर दिले आहे.
“अभिषेक कितीही मैत्रीपूर्ण असला तरी त्याने एका पुरस्कारासाठी कसे पैसे दिले आणि वाईट जनसंपर्क वापरून स्वत:ला कशाप्रकारे उत्तम दाखवण्याचा प्रयत्न केला, याचं उदाहरण समोर आलं आहे. संपूर्ण करिअरमध्ये एकही सोलो ब्लॉकबस्टर चित्रपट नसला तरी अभिषेकला यावर्षी ‘आय वाँट टू टॉक’साठी पुरस्कार मिळाला आहे.
हा चित्रपट काही मोजक्या पैसे मिळालेल्या समीक्षकांशिवाय कोणीही पाहिलेला नाही. आता अचानक मला असे ट्विट्स दिसत आहे, ज्यात 2025 हे अभिषेकचं वर्ष असल्याचा दावा केला जात आहे. हे सर्व खूपच मजेशीर आहे. त्याच्यापेक्षा बरेच चांगले कलाकार आहेत, जे खरंच पुरस्कारांसाठी पात्र आहेत. पण दुर्देवाने त्यांच्याकडे जनसंपर्काचा जाणकार किंवा पैसाही नाही”, अशी पोस्ट लिहित एका युजरने अभिषेकवर निशाणा साधला.
या आरोपांवर अभिषेकने एक्स (ट्विटर) अकाऊंटवरील पोस्टमध्ये संबंधित युजरला सडेतोड उत्तर देत लिहिलं, ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी कधीही कोणतेही पुरस्कार खरेदी केलेले नाहीत किंवा मी कधीही भरभरून पीआर केलेलं नाही. मी जे काही केलं, ते कठोर परिश्रम करून, घाम गाळून आणि अश्रू वाहून केलं आहे.
पण मी जे काही बोलतोय किंवा लिहितोय त्यावर तुम्ही विश्वास ठेवाल असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अधिक मेहनत करणं. जेणेकरून तुम्हाला भविष्यातील माझ्या कोणत्याही कामगिरीवर कधीही शंका उपस्थित होणार नाही. मी तुम्हाला चुकीचं सिद्ध करेन आणि तेसुद्धा अत्यंत आदरपूर्वक मार्गाने…’ असे अभिषेकने म्हंटले आहे.
दरम्यान, अभिषेक बच्चनचा ‘आय वॉन्ट टू टॉक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला आहे. त्याने या चित्रपटात एका वडिलांची भूमिका साकारली आहे, ज्याला कॅन्सर असतो आणि नंतर धोकादायक आजाराला तो लढा देतो. त्याचे चित्रपटातील अभिनयाचे खूप कौतुक झाले पण चित्रपटाची पटकथा प्रेक्षकांना फारशी आवडली नाही.





