TNCA Event : आव्हानांचा सामना केल्यानेच अश्विन यशस्वी; अनिल कुंबळेने केली स्तुती…

Anil Kumble On Ravichandran Ashwin- भारताचा ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने समोर आलेल्या आव्हानांचा निडरपणे सामना केला. त्यामुळेच त्याला यशाच्या शिखरावर पोहोचता आले आहे, अशा शब्दांत भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने अश्विनची स्तुती केली.
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान अश्विनने ५०० बळींचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो कुंबळेनंतरचा केवळ दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. अश्विनच्या नावे आता ५१६ बळी असून माजी लेग-स्पिनर कुंबळेने कसोटीत ६१९ बळी मिळवले होते. कसोटी कारकीर्दीत १०० सामने आणि ५०० बळी पूर्ण केल्याबद्दल तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या वतीने अश्विनचा सत्कार करण्यात आला. या सोहळयादरम्यान कुंबळेने अश्विनच्या यशस्वी कामगिरीचे कौतुक केले.
अश्विनसमोर विविध आव्हाने उभी राहिली. मात्र, या आव्हानांचा त्याने निडरपणे सामना करताना आपली प्रगती थांबू दिली नाही. दशकभराहूनही अधिक काळापासून तो देशाला सामने जिंकवून देत आहे. त्याने कामगिरीत जे सातत्य राखले आहे, ते वाखाणण्याजोगे आहे. तो इतरांसाठी आदर्श आहे, असे कुंबळे म्हणाला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/wpl-2024-rcb-prize-money-money-rained-on-champion-royal-challengers-bangalore/
भारतामध्ये तुम्ही आपला दर्जा सिद्ध केला आणि स्वत:साठी एक स्तर निर्माण केला की त्यानंतर प्रत्येक सामन्यात तुमच्याकडून खूप अपेक्षा केल्या जातात. गोलंदाज म्हणून तुम्ही पाच गडी बाद न केल्यास, त्याकडे अपयश म्हणून पाहिले जाते. अश्विनने या अपेक्षा योग्य रीतीने हाताळल्या आहेत. त्यामुळेच तो इतका यशस्वी ठरला आहे, असेही कुंबळे म्हणाला.





