Nayanthara : ‘टॉक्सिक’ रिलीजआधी नयनताराने केलं टक्कल? तिरुमलाचे फोटो पाहून चाहतेही चक्रावले !
सोशल मीडियावर नयनताराचे काही फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात होते. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आणि हिरव्या ओढणीमध्ये दिसत होती.

Nayanthara : साऊथ सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक : अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे सिनेमाच्या रिलीजची तारीख जवळ येत असताना यशच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, तर दुसरीकडे सिनेमातील अभिनेत्री नयनतारा एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली.
नयनताराने ‘टॉक्सिक’ सिनेमासाठी चक्क टक्कल केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. मात्र, या व्हायरल फोटोंमागचं खरं सत्य आता समोर आलं असून, नयनताराने टक्कल केल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे फॅक्ट-चेकमधून समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर नयनताराचे काही फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात होते. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आणि हिरव्या ओढणीमध्ये दिसत होती.
मात्र, तिच्या डोक्यावर केस नसल्याचं दिसत असल्याने तिने तिरुमला मंदिरात जाऊन टक्कल केल्याचा दावा करण्यात आला. इतकंच नाही तर ‘टॉक्सिक’ सिनेमाच्या यशासाठी नयनताराने हा नवस केल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली.
‘टॉक्सिक’मध्ये नयनतारा महत्त्वाची भूमिका साकारत असल्याने या दाव्याला आणखी हवा मिळाली. काही चाहत्यांनी तर अभिनेत्रीने सिनेमातील भूमिकेसाठी आपला लूक बदलल्याचा अंदाजही व्यक्त केला. मात्र, हे फोटो बारकाईने तपासल्यानंतर वेगळंच वास्तव समोर आलं.
नयनताराचे टक्कल असलेले फोटो AIने तयार केले?
फॅक्ट-चेकनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेले नयनताराचे टक्कल असलेले फोटो खरे नसून ते डिजिटल पद्धतीने बदलण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या व्हायरल फोटोंमध्ये दिसणारे कपडे, दागिने आणि पार्श्वभूमी नयनताराच्या खऱ्या तिरुमला भेटीतील फोटोंशी जुळतात.
Nayanthara🤯🤯 pic.twitter.com/AuJUurZLrt
— sabas csk (@saba9361) August 16, 2026
मात्र, मूळ फोटोंमध्ये तिच्या डोक्यावर व्यवस्थित केस दिसत आहेत. व्हायरल करण्यात आलेल्या फोटोमध्ये डिजिटल एडिटिंग/AIच्या माध्यमातून तिचे केस काढण्यात आले आहेत. नयनतारा एप्रिलमध्ये पती विग्नेश शिवनसोबत तिरुमला मंदिरात दर्शनासाठी गेली होती.
त्यावेळी काढण्यात आलेल्या तिच्या मूळ फोटोंचा वापर करून त्यात बदल करण्यात आल्याचे फॅक्ट-चेकमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘टॉक्सिक’च्या रिलीजआधी नयनताराने टक्कल केलं, हा दावा चुकीचा आहे.
‘टॉक्सिक’मध्ये नयनतारासोबत पाच अभिनेत्रींची जुगलबंदी :
दरम्यान, ‘टॉक्सिक’ हा सिनेमा रिलीजआधीच चर्चेचा विषय ठरला आहे. ‘केजीएफ’ फेम यश मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केलं आहे.
सिनेमात यशसोबत नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत आणि हुमा कुरेशी या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
यशचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा अखेर २६ ऑगस्ट २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा कन्नड आणि इंग्रजी भाषेत शूट करण्यात आला असून हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळमसह विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.






