..तेव्हा यांनी पोलिसांना आदेश दिले होते का? विरोधकांना संजय गायकवाड यांचे प्रत्युत्तर

मुंबई – विरोधी पक्ष आज आमच्यावर टीका करत आहे, परंतु वर्षभराआधी हेच लोक सरकारमध्ये होते. त्यांच्या काळात अशा प्रकारच्या ज्या घटना घडल्या तेव्हा यांनी पोलिसांना आदेश दिले होते का? अशा कुठल्याही घटनेत मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री अशा प्रकारचे आदेश देत नाहीत. तो तिथल्या एखाद्या अधिकाऱ्याचा विक्षिप्तपणा असू शकतो. त्याची चौकशी होईल आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होईल. सरकार त्याच्यावर कारवाई करेल, असे म्हणत शिवसेनेच्या शिंदे गटाने विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर दिसू लागल्या की विरोधकांना आग लावण्याचे काम करत आहे. शरद पवार यांनी आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे कधी समर्थन केले का? ते चार वेळा मुख्यमंत्री झाले. तेव्हा कधीच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली नाही.
विरोधकांचे हे सगळं नाटक सुरू आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार वेगवान कामगिरी करत असल्याचा दावा त्यांनी केला.





