Anushka Sharma: होमिओपॅथीबाबतचे मत अनुष्काला पडले महागात? सोशल मीडियावर टीकेचा भडिमार
Anushka Sharma अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, होमिओपॅथीने तिच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ती तिच्या आरोग्य प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे. तसेच डॉ. राजन शंकरन यांच्या आरोग्य आणि सजग जीवनशैलीबाबतच्या दृष्टिकोनाचेही तिने कौतुक केले.

Anushka Sharma: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अनुष्काने नुकतेच होमिओपॅथीच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. काहींनी तिच्या मताला पाठिंबा दिला, तर अनेकांनी तिच्यावर टीका करत होमिओपॅथीच्या वैज्ञानिकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. राजन शंकरन आणि उद्योजिका तसेच ‘शार्क टँक इंडिया’ची परीक्षक नमिता थापर यांच्यातील संवादाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओसोबत तिने होमिओपॅथीबाबत आपला सकारात्मक अनुभवही मांडला.
anushka post on homeopathy
अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, होमिओपॅथीने तिच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ती तिच्या आरोग्य प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे. तसेच डॉ. राजन शंकरन यांच्या आरोग्य आणि सजग जीवनशैलीबाबतच्या दृष्टिकोनाचेही तिने कौतुक केले.
या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही चाहत्यांनी अनुष्काच्या मताचे स्वागत केले आणि होमिओपॅथीमुळे त्यांनाही फायदा झाल्याचे सांगितले. अनेकांनी आपल्या वैयक्तिक अनुभवांचा उल्लेख करत होमिओपॅथीवर विश्वास व्यक्त केला.
मात्र दुसरीकडे, अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या पोस्टवर आक्षेप घेतला. काहींनी होमिओपॅथीला वैज्ञानिक आधार नसल्याचा दावा करत अनुष्काने अशा उपचारपद्धतीचे समर्थन करू नये, असे मत व्यक्त केले. काहींनी प्रसिद्ध व्यक्तींनी आरोग्यविषयक माहिती शेअर करताना अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचेही म्हटले.
डॉ. राजन शंकरन आणि नमिता थापर यांच्या व्हिडीओमधील चर्चाही वादाचा विषय ठरली. या चर्चेत डॉ. शंकरन यांनी होमिओपॅथी ही व्यापक आरोग्य व्यवस्थेचा एक भाग म्हणून पाहिली जावी, असे मत मांडले होते. प्रत्येक वैद्यकीय पद्धतीच्या काही मर्यादा असतात, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, होमिओपॅथी केवळ आजारांवर नव्हे तर व्यक्तीच्या एकूण आरोग्यावर लक्ष केंद्रित करते.
या संपूर्ण प्रकरणात यकृतविकार तज्ज्ञ डॉ. सिरीयाक अॅबी फिलिप्स, ज्यांना सोशल मीडियावर ‘द लिव्हर डॉक’ म्हणून ओळखले जाते, यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. होमिओपॅथीवर सातत्याने टीका करणाऱ्या डॉ. फिलिप्स यांनी अनुष्का शर्मा, नमिता थापर आणि डॉ. राजन शंकरन यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अशा प्रकारच्या आरोग्यविषयक दाव्यांबाबत कठोर शब्दांत टीका केली.
Ayurveda is also pseudoscience, not only Homeopathy. And so are Naturopathy, Unani and Siddha. There is no “better” pseudoscience. They are all utter nonsense. Also, Homeopathy too, is a whole lot of herbs and herbal tinctures, also making it “natural”. No one really reads the… https://t.co/8FQmY0tGvj
— TheLiverDoc™ (@theliverdoc) June 3, 2026
दरम्यान, सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी अनुष्काच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. काहींनी ती मोठ्या प्रमाणावर लोकांवर प्रभाव टाकणारी व्यक्ती असल्यामुळे अशा विषयांवर अधिक काळजीपूर्वक बोलण्याची गरज असल्याचे म्हटले. तर काहींनी होमिओपॅथीबाबत आपले सकारात्मक अनुभव सांगत अभिनेत्रीचे समर्थन केले.
या वादामुळे पुन्हा एकदा होमिओपॅथीच्या प्रभावीपणा आणि वैज्ञानिक आधाराविषयी चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला होमिओपॅथीवर विश्वास ठेवणारे लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला पुराव्यावर आधारित वैद्यकीय उपचारांना प्राधान्य देणारे तज्ज्ञ आहेत.
सध्या या वादावर अनुष्का शर्माने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे आरोग्य, उपचारपद्धती आणि सेलिब्रिटींची सामाजिक जबाबदारी यांसारख्या विषयांवर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.





