Anushka Sharma: बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी संघर्ष किती महत्त्वाचा असतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनुष्का शर्मा. आज ती हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे, पण तिच्या करिअरची सुरुवात मात्र खूप कठीण होती. वारंवार मिळालेल्या रिजेक्शनमुळे ती खचली नाही, उलट त्याच अनुभवांनी तिचं आयुष्य बदललं. १ मे रोजी जन्मलेल्या अनुष्का शर्मा हिला सुरुवातीला अभिनय क्षेत्रात येण्याचा काही ठराविक प्लॅन नव्हता. ती आर्मी पार्श्वभूमीतून आलेली असल्यामुळे तिचं बालपण शिस्तीत गेलं. सुरुवातीला तिला पत्रकारिता किंवा मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं होतं. त्यामुळे तिने लहान वयातच मॉडेलिंगला सुरुवात केली. मात्र, या क्षेत्रातही तिला अनेक वेळा अपयशाचा सामना करावा लागला. मॉडेलिंग करताना अनुष्काला सतत रिजेक्शन मिळत होतं. एका महिन्यात तिला जवळपास चार वेळा नकार मिळाला होता. ती विविध जाहिरातींसाठी ऑडिशन देत होती, पण प्रत्येक वेळी अंतिम फेरीपर्यंत पोहोचूनही निवड होत नव्हती. हा काळ तिच्यासाठी खूप कठीण होता. तरीही तिने हार मानली नाही. हाच संघर्ष पुढे तिच्या यशाचं कारण ठरल. या दरम्यान तिला ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटासाठी स्क्रीन टेस्ट देण्याची संधी मिळाली. पण त्या वेळीही तिला स्वतःवर फारसा विश्वास नव्हता. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, ती या ऑडिशनसाठी अजिबात तयारी करून गेली नव्हती. ती अगदी साध्या लूकमध्ये, मेकअप न करता ऑडिशनला पोहोचली होती. तिला वाटत होतं की इथेही नक्कीच रिजेक्शन मिळेल. Anushka Sharma मात्र काही दिवसांनी तिला दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या टीमकडून कॉल आला. त्यांना अंतिम ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं. तरीही तिच्या मनात भीती होती की शेवटच्या क्षणी तिला नाकारलं जाईल. पण यावेळी तिचं नशीब तिच्या बाजूने होतं. आदित्य चोप्रा आपल्या चित्रपटासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. त्यांना अशी अभिनेत्री हवी होती जी प्रेक्षकांसाठी पूर्णपणे फ्रेश वाटेल. अनुष्का शर्मा या निकषांवर अगदी फिट बसली. त्यामुळे तिला या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली. ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत काम केलं आणि ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि अनुष्काच्या करिअरला एकदम नवं वळण मिळालं. तिच्या नैसर्गिक अभिनयामुळे आणि साध्या व्यक्तिमत्त्वामुळे ती लवकरच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. त्यानंतर तिने अनेक यशस्वी चित्रपट दिले आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. अनुष्का शर्मा यांची ही कहाणी सांगते की, अपयश ही शेवट नसून यशाची सुरुवात असू शकते. योग्य वेळी मिळालेली संधी आणि स्वतःवरचा विश्वास यामुळे कोणाचंही आयुष्य बदलू शकतं.