एपीआयमधील हिरा…हिकल लिमिटेड

कंपनी ओळख
हिकल लिमिटेडची स्थापना 1988 मध्ये हिरेमठ कुटुंबीय, कल्याणी समूह आणि सुमिटोमो कॉर्पोरेशन या जपानी कंपनीच्या इक्विटी सहभागातून झाली. केमिकल्स, इंटरमिजिएटस्, डाईज, फार्मास्युटिकल्स आणि पेस्टसाईडचे उत्पादन आणि मार्केटिंग या उद्देशाने कंपनीने काम सुरू केले. आज कंपनी जगभरातील औषध कंपन्या, प्राण्यांच्या आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या, बायोटेक, पिकांसाठीची जीवरक्षके आणि स्पेशालिटी केमिकल्स या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्यांना जागतिक दर्जाची उत्पादने तसेच संशोधन आणि विकास सेवा पुरवते.
औषधांच्या क्षेत्रात ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियेन्टस् (एपीआय), गरजेनुसारची उत्पादने, इंटरमिजिएटस् आणि अडव्हॉन्स्ड इंटरमिजिएटसाठी हिकल लिमिटेड ओळखली जाते. पीक रक्षणासाठीच्या क्षेत्रातही कंपनी काम करते. त्याखेरीज प्रक्रिया विकास, नवी उत्पादनांचा विकास यासाठी कंपनी काम करते.
कंपनीच्या महाड येथील प्रकल्पातून 1991 पासून तर तळोजा येथील प्रकल्पातून 1998 पासून आणि गुजरातमधील पानोली येथील प्रकल्पातून 2000 पासून उत्पादन सुरू झाले. सुमिटोमो कंपनीचे जगभर मार्केटिंगचे जाळे आहे त्याद्वारे हिकल लिमिटेडची उत्पादने बाजारपेठेत पोहोचवली जातात. जगभरात मार्केटिंग आणि व्यापार क्षेत्रात अव्वल समजल्या जाणाऱ्या सुमिटोमो कॉर्पोरेशनने 1993 मध्ये हिकल लिमिटेडचे 3.62 टक्के शेअर घेतले.
जपानमधील आघाडीच्या कंपनीने प्रथमच भारतीय कंपनीत याद्वारे गुंतवणूक केली. 1996 मध्ये टीबीझेड या प्रिझर्व्हेटिव्ह, अँटीफंगल, अँटीपॅरॅस्टिक एजंट म्हणून काम करणाऱ्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी कंपनीने पब्लिक इश्यूद्वारे शेअरबाजारात पदार्पण केले. टीबीझेडच्या उत्पादनासाठी तळोजा येथे नवीन प्रकल्प उभारला. 2000 मध्ये कंपनीने गुजरातमधील पानोली येथील अग्रोकेमिकल उत्पादन प्रकल्प नोवार्टिस इंडिया लिमिटेडकडून घेतला. 2004 मध्ये कर्नाटकातील बेंगळुरूनजीक असलेले विन्टॅक लिमिटेड कंपनीचे आर अँड डी युनिट आणि बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरिंग युनिट कंपनीने घेतले. याच काळात कंपनीने पुण्यात अत्याधुनिक संशोधन आणि विकास केंद्र उभारले.
कंपनीचा विस्तार व विकास यासाठी अमेरिका, चीन अशा देशांमधील विविध कंपन्यांशी हिकल लिमिटेडने सहकार्य करार केले. त्याचवेळी युरोपातील औषध वितरण करणारी आणि सुमारे 250 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणारी मार्सिंग अँड कंपनी ताब्यात घेतली.
नव्या पिढीतील पीक रक्षकांचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी हिकल लिमिटेडने अमेरिकेतील कॉम्पटन कॉर्पोरेशनबरोबर दीर्घकालीन करार केला. 2006 मध्ये कंपनीने जर्मनीतील रसायन क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या इगुसा या कंपनीबरोबर एपीआय (ऍक्टिव्ह फार्मा इनग्रेडियंटस्) आणि फार्मा इंटरमिजिएटच्या पुरवठ्यासाठी करार केला.
सध्याच्या घडीला कंपनीचे भारतात पाच ठिकाणी उत्पादन प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात तळोजा आणि महाड, गुजरातमध्ये पानोली आणि कर्नाटकातील जिगानी येथे दोन युनिट तसेच पुण्यात कंपनीचे संशोधन आणि तंत्रज्ञान केंद्र आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि जागतिक नियामक संस्थांकडून कंपनीतील सुविधांची नियमितपणे पाहणी केली जाते.
त्यामुळेच इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ केमिकल असोसिएशनचे (आयसीसीए) रिस्पॉन्सिबल केअर प्रमाणपत्र मिळवणारी हिकल लिमिटेड ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. कंपनीचे सर्व प्रकल्प हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे आणि विविध वैशिष्ट्यांनी युक्त आहेत. अगदी ग्रॅमपासून ते किलो, टनापर्यंत पीक रक्षक उत्पादने कंपनीच्या किलो लॅब, पथदर्शक प्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्पात काटेकोर नियम पाळून विकसित करण्याचा अनुभव कंपनीकडे आहे.
कंपनीच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळावर डॉ. ऍक्सेल क्लीमन डॉ. गोवर्धन मेहता, डॉ. के. नागराजन यांच्यासारखे तज्ज्ञ आहेत. डॉ. क्लीमन हे संशोधन आणि विकास, उत्पादन, अभियांत्रिकी आणि ड्रग सुरक्षा या विषयातील गाढा अनुभव आणि ज्ञान असलेलेल व्यक्तिमत्त्व आहे. जर्मनीतील ईगुसा म्हणजेच सध्याच्या इवोनिक इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट ऑरगॅनिक रिसर्च विभागाचे ते संचालक होते. ऍस्टा मेडिका कंपनीत त्यांच्याकडे 2000 पर्यंत संशोधन आणि विकास, उत्पादन, अभियांत्रिक आणि ड्रग सुरक्षेची त्यांच्याकडे जबाबदारी होती. ते प्रोटाजेन या जर्मन कंपनीच्या संचालक मंडळावर होते. बायोटेक आणि फाईन केमिकल क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या सल्लागार मंडळांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे. ते फ्रॅंकफर्ट येथील जॉन वुल्फगॅंग गॉथे विद्यापीठात रसायनशास्त्राचे मानद प्राध्यापक आहेत. गोवर्धन मेहता हे जगभर ऑरगॅनिक केमिस्ट म्हणून ओळखले जातात.
हैदराबाद विद्यापीठातील स्कूल ऑफ केमिस्ट्रीमध्ये ते राष्ट्रीय संशोधक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये पीएच.डी. संपादन केली आहे. त्यानंतर अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठ आणि ओहियो विद्यापीठांमध्ये संशोधन केले आहे. के. नागराजन यांच्याकडे रसायनशास्त्रातील तब्बल 56 वर्षांचा अनुभव आहे. रसायनशास्त्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. हिकलमधील वैज्ञानिक संशोधनात त्यांचा पुढाकार असतो.
फार्मा क्षेत्रातील सध्याची तेजी पाहता गेली अनेक वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या आणि प्रगतीपथावर असलेल्या हिकल लिमिटेडचा अभ्यास गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त ठरू शकतो.
– सुहास यादव ([email protected])





