Dhruv Jurel Century : ध्रुव जुरेलचा शतकी धमाका! चौकार-षटकारांची बरसात करत ठोकली टीम इंडियात दावेदारी

१०१ चेंडू अन् १६० धावा; ‘लिस्ट-ए’ कारकिर्दीतील पहिले शतक
बडोद्याविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ध्रुव जुरेलने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने केवळ १०१ चेंडूंमध्ये १६० धावांची नाबाद खेळी केली. विशेष म्हणजे, ‘लिस्ट-ए’ क्रिकेटमधील (५० षटके) हे जुरेलचे पहिलेच शतक आहे. या खेळीत त्याने १५ चौकार आणि ८ षटकार ठोकले.
जुरेलच्या या वादळी खेळीमुळे उत्तर प्रदेशने ५० षटकांत ३६९ धावांचा डोंगराएवढा स्कोअर उभा केला. जुरेल व्यतिरिक्त अभिषेक गोस्वामीने ५१ आणि रिंकू सिंगने ६७ चेंडूत ६३ धावांचे योगदान दिले.
वनडे पदार्पणाची प्रतीक्षा संपणार?
ध्रुव जुरेलने आतापर्यंत भारतासाठी कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे, मात्र त्याला अजून एकही वनडे आंतरराष्ट्रीय सामना खेळता आलेला नाही. त्याने आतापर्यंत ९ कसोटी सामन्यात ४५९ धावा (१ शतक, १ अर्धशतक) केल्या आहेत. तसेच ४ टी-२० सामन्यात १२ धावा केल्या आहेत. ज्या पद्धतीने जुरेल सध्या धावा कुटत आहे, ते पाहता त्याला लवकरच वनडे संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
न्यूझीलंड मालिकेसाठी संघ निवडीवर नजर –
येत्या ११ तारखेपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. बीसीसीआयची निवड समिती विजय हजारे ट्रॉफीमधील खेळाडूंच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
हेही वाचा – Sonam Yeshey : क्रिकेट जगतात खळबळ! २२ वर्षीय गोलंदाजाचा टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड
यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सध्या इशान किशनचे नाव आघाडीवर असले, तरी जुरेलने १६० धावांची खेळी करून निवडकर्त्यांपुढे पेच निर्माण केला आहे. रिषभ पंत, इशान किशन आणि आता ध्रुव जुरेल यांच्यातील स्पर्धेमुळे कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





