Dhom Dam: धोम धरणाच्या सुरक्षेचा बोजवारा! नियम धाब्यावर बसवून बांधकाम; तालुक्यात संतापाची लाट
Dhom Dam: धोम धरण क्षेत्राच्या संरक्षित हद्दीत अनधिकृत दगडी पूल आणि कंटेनर रूमची उभारणी; सामान्य गाळपेर शेतकऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष.

Dhom Dam- वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील धोम धरणाच्या जलाशयालगतच्या क्षेत्रात कथितरीत्या अनधिकृत बांधकाम करून दगडी पूल उभारण्यात आल्याची, तसेच धरणाच्या हद्दीतील जागेचा वापर करून कंटेनर रूम उभारण्यात आल्याची बाब समोर येत आहे. धरणाच्या संरक्षित क्षेत्रात अशा प्रकारची बांधकामे झाली असतील, तर त्यांना परवानगी कोणी दिली? संबंधित कामे पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आली नाहीत का? आली असतील,
तर अद्याप कारवाई का झाली नाही? असे सवाल उपस्थित होत असून, धोम धरण क्षेत्रातील कथित अतिक्रमणामुळे पाटबंधारे विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धरणाच्या जलाशयालगतच्या जागेचा वापर, जमिनीवरील बांधकामे आणि अतिक्रमण याबाबत नियम व निर्बंध असताना एका बाजूला धरण क्षेत्रात गाळपेर करणार्या सामान्य शेतकर्यांवर नियमांचा बडगा उगारला जातो.
मग दुसर्या बाजूला धरणाच्या हद्दीत दगडी पूल आणि कंटेनर रूमसारखी बांधकामे उभी राहत असतील, तर संबंधित यंत्रणा कोणत्या कारणामुळे शांत आहे? सामान्यांसाठी नियम कडक आणि प्रभावशाली व्यक्तींसाठी मोकळे रान, असा कारभार सुरू आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दगडी पूल उभारला कोणाच्या परवानगीने?
धोम धरण क्षेत्रात उभारण्यात आलेल्या कथित दगडी पुलाचा नेमका वापर कशासाठी केला जात आहे? हा पूल उभारण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली होती का? तसेच धरणाच्या हद्दीतील जागेवर कंटेनर रूम उभारण्याचा अधिकार संबंधितांना कोणी दिला? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. संबंधित जागा कोणाच्या मालकीची आहे, बांधकामासाठी महसूल अथवा पाटबंधारे विभागाची ना-हरकत किंवा अन्य आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का, याची वस्तुस्थिती प्रशासनाने स्पष्ट करावी.





