Archery World Cup Gold : भारतीय तिरंदाजांचा सुवर्णवेध! धीरज-कुमकुमने ऑलिम्पिक चॅम्पियन कोरियाला नमवत जिंकलं ऐतिहासिक ‘गोल्ड’
Archery World Cup Gold : भारताचे शूर तिरंदाज धीरज बोम्मादेवरा आणि कुमकुम मोहोद या जोडीने अप्रतिम कौशल्याचे प्रदर्शन करत रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.

Archery World Cup Gold Antaly Dhiraj Bommadevara Kumkum Mohod : तुर्कीच्या अंताल्या येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज ३ (Archery World Cup Stage 3) स्पर्धेतून भारतासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचे शूर तिरंदाज धीरज बोम्मादेवरा (Dhiraj Bommadevara) आणि कुमकुम मोहोद (Kumkum Mohod) या जोडीने अप्रतिम कौशल्याचे प्रदर्शन करत रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. या अत्यंत चुरशीच्या आणि ऐतिहासिक अंतिम सामन्यात भारतीय जोडीने बलाढ्य ऑलिम्पिक चॅम्पियन दक्षिण कोरियाचा ५-१ (३७-३६, ३७-३६, ३९-३९) असा धुव्वा उडवला.
धीरज आणि १७ वर्षीय कुमकुमचा अचूक निशाणा –
या हाय-व्होल्टेज सामन्यात २४ वर्षीय धीरज आणि अवघ्या १७ वर्षांची युवा कुमकुम मोहोद यांच्यात जबरदस्त ताळमेळ पाहायला मिळाला. जागतिक क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर असलेल्या धीरजने सामन्याच्या शेवटच्या क्षणी अचूक ‘परफेक्ट १०’ चा स्कोअर करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दोघांनीही संपूर्ण सामन्यात प्रत्येकी ३-३ वेळा ‘परफेक्ट १०’ चा वेध घेतला. धीरज आणि कुमकुम या दोघांचेही मिक्स्ड टीममधील हे कारकिर्दीतील पहिलेच विश्वचषक सुवर्णपदक आहे.
धीरजने यापूर्वी २०२४ मध्ये अंकिता भकतसोबत आणि २०२५ मध्ये भजन कौरसोबत कांस्यपदक जिंकले होते, तर कुमकुमचे हे सलग दुसरे विश्वचषक सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी तिने शांघायमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला संघात मोलाचे योगदान दिले होते.
INDIAN DUO HAS STUNNED OLYMPICS CHAMPION SOUTH KOREA IN RECURVE ARCHERY! 🤩💥
– Dhiraj Bommadevara & Kumkum Mohod of India wins the Archery World Cup, Antalya 2026 🏆pic.twitter.com/HhanwbZty5
— The Khel India (@TheKhelIndia) June 14, 2026
श्वास रोखायला लावणारा अंतिम सामना –
सामन्याच्या पहिल्या सेटपासूनच भारतीयांनी कोरियन संघावर मानसिक दबाव निर्माण केला होता. पहिल्या सेटमध्ये कुमकुमचा स्कोअर रिव्ह्यूनंतर ९ वरून १० झाला, ज्यामुळे भारताने ३७-३६ असा पहिला सेट जिंकून २-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येही अटीतटीची लढत झाली, पण लष्करातील तिरंदाज धीरजने शेवटच्या बाणावर ‘परफेक्ट १०’ मारत भारताला ४-० ने पुढे केले.
तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दक्षिण कोरियाने ३९ गुणांचा मोठा स्कोअर करत जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. भारताला विजयासाठी शेवटच्या दोन्ही बाणांवर अचूक निशाणा साधायचा होता. अशा प्रचंड दबावाच्या परिस्थितीत आधी कुमकुमने ‘परफेक्ट १०’ मारला आणि नंतर धीरजच्या शॉटलाही रिव्ह्यूनंतर १० गुण मिळाले. हा सेट ३९-३९ असा टाई झाला आणि एकूण ५-१ च्या फरकाने भारताने सुवर्णपदकावर नाव कोरले.





