Solapur News : सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का ! जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

सोलापूर : सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेल्या धक्क्यानंतर आता आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
धवलसिंह मोहिते पाटलांनी काय केले आरोप?
2021 पासून जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून काम केलं. ज्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे यांना दहा वर्षे पराभव स्वीकारावा लागला त्या ठिकाणी प्रणिती शिंदे यांना निवडून आणले. प्रणिती शिंदे ज्या ठिकाणच्या आमदार होत्या त्या ठिकाणी त्यांना फक्त 779 लीड मिळालं. पण पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये सुमारे 66 हजारांचे लीड दिले आणि लोकसभेला निवडून आणले.
असं असतानाही विधानसभेला पक्षाने विश्वासात न घेता उमेदवार दिले. त्यामध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. काँग्रेस पक्ष मोठा की सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे मोठ्या? रक्ताचे पाणी करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर हा प्रश्न पडला आहे. पक्षापेक्षा व्यक्ती मोठी झाली तर त्यासाठी काम करणे कठीण आहे. अशा परिस्थितीत आम्ही काम करू शकणार नाही.
भविष्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये शिंदे गट अशाच पद्धतीने काम करणार असून तो प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय ठरेल. त्यामुळे आपण पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहोत असं धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.





