धारावी मॉडेल ठरतेय आदर्शवत; जागतिक स्तरावर पुन्हा दखल

मुंबई – जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि जागतिक बॅंकेपाठोपाठ (वर्ल्ड बॅंक) आणखी एका बड्या संस्थेने धारावीच्या करोना पॅटर्नची दखल घेतली आहे. करोना रोखण्यासाठी सर्वांनीच धारावीकडून धडे घेण्याचा सल्ला ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिला आहे. त्याचप्रमाणे ओदिशातील गंजामचे मराठमोळे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांच्या कामाचीही दखल घेण्यात आली आहे.
करोना संक्रमण रोखण्यासाठी लहान भागांवर लक्ष केंद्रित करायला हवे, ही बाब ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 310 शहरांचा अभ्यास केल्यानंतर कबूल केली. ओदिशातील गंजाम आणि महाराष्ट्रातील धारावीकडून हे शिकता येऊ शकते. तिथे हजारो जण करोनाग्रस्त होते,
मात्र आजच्या घडीला तिथे 200 पेक्षाही कमी रुग्ण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनंतर नुकतेच जागतिक बॅंकेनेही धारावी मॉडेलचे कौतुक केले होते.
ऑक्सफर्ड आणि पूर्वोत्तर विद्यापीठांच्या टीमने याविषयी संशोधन केले होते. घनदाट लोकसंख्या असलेल्या लहान वस्तीत करोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याचे समोर आले. खेड्यांच्या तुलनेत शहरी भागात संसर्ग वेगाने पसरत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
माद्रिद आणि लंडनसारख्या घनदाट लोकसंख्या असलेल्या भागाकडे लक्ष न दिल्याने करोना संसर्ग वाढला. प्रत्येक शहरासाठी सारखी पद्धत असेलच असे नाही. परंतु स्क्रीनिंगची पद्धत सारखीच असावी, असही ऑक्सफर्ड विद्यापीठाने म्हटले आहे.
ओदिशाच्या गंजाम जिल्ह्यात दोन मे रोजी करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. ऑगस्टमध्ये करोना वाढीचा दर 59 टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर केलेल्या उपाययोजनांमुळे आता 20 हजार 430 रुग्णांपैकी 98 टक्के संपूर्ण बरे झाले आहेत.
केवळ 188 रुग्ण बाधित आहेत. गंजामचे जिल्हाधिकारी विजय कुलांगे हे मूळ अहमदनगरचे. राळेगण म्हसोबा हे त्यांचे गाव. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कुलांगेंचे कौतुक केले होतेच. मात्र जागतिक स्तरावरही त्यांची दखल घेण्यात आली आहे.
धारावी पॅटर्न
धारावी झोपडपट्टी जवळपास 2.5 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसलेली असून या ठिकाणी 6 लाख 50 हजार नागरिक राहतात. गजबजाट आणि गर्दीतील झोपड्या, उघडी गटारं, अरुंद रस्ते अशा परिस्थितीत हे सर्व नागरिक येथे राहतात. अशी आव्हाने असतानाही या ठिकाणी प्रभावीपणे करोना नियंत्रणाचे काम यशस्वीपणे करण्यात आहे. यात सरकारी यंत्रणांसोबतच स्वयंसेवी संस्था, इतर स्वयंसेवक यांनी कोरोना नियंत्रण आणि नागरिकांना मदतीसाठी मोठी मेहनत घेतली आहे.





