Dharashiv Accident : धाराशिव जिल्ह्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या आठवडाभरापूर्वी साखरपुडा झालेल्या तरुण जोडप्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धाराशिवजवळील रत्नापूर पाटी परिसरात ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय शिनगारे (वय २५) आणि इजोरा येथील अक्षया सुनील चव्हाण (वय २३, सध्या मुक्काम वाशी) यांचा १५ तारखेला मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता. रविवारी अक्षयाची लातूर येथे महापारेषणची परीक्षा असल्याने दोघे पहाटे कारने वाशीहून लातूरकडे निघाले होते. रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार टोल नाक्याच्या कमानीवर जाऊन जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. संसार सुरू होण्याआधीच या दोघांच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. ट्रक-ट्रॅक्टरची धडक; दोघांचा मृत्यू दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील कोरची जवळील मोहगाव फाट्यावर ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. हैदराबादहून रायपूरकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रॅक्टर उलटल्याने चार मजूर दबले गेले. या अपघातात सागर कल्लो आणि कैलास कोवे यांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी आहेत. मद्यधुंद ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. टेम्पो-कार अपघात, जीवितहानी टळली तसेच मुंबई-गोवा महामार्ग वर राजापूर खरवते येथे टेम्पोने कारला धडक दिल्याची घटना घडली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. राज्यातील सलग अपघातांच्या घटनांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.