धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या; करुणा शर्मा यांची हायकोर्टात धाव, गेले ‘हे’ गंभीर आरोप…

छत्रपती संभाजीनगर – बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांनी थेट हायकोर्टात धाव घेऊन मुंडेंवर आपल्या पहिल्या पत्नीच्या नावे असणारी मालमत्ता व कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.
करुणा शर्मा यांनी वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नीच्या नावावरील एकूण संपत्ती व कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवल्याचा दाखला दिला आहे.
वकील चंद्रकांत ठोंबरे या प्रकरणी म्हणाले की, माझ्या अशिल करुणा शर्मा – मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांचा अर्ज फेटळण्यात आला. याऊलट धनंजय मुंडे व इतरांचे अर्ज मंजूर झाले. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2024 रोजी धनंजय मुंडे यांना विजयी घोषित करण्यात आले.
पण त्यांचा हा विजय गैरमार्गाने मिळवलेला आहे. आम्ही करुणा मुंडे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटीशन दाखल केली आहे. त्यात आमचे प्रमुख मुद्दे आहेत की, धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नीचा ज्या त्यांच्या कायदेशीर पत्नी आहेत, त्यांचा कुठेही उल्लेख केला नाही.
एवढेच नाही तर त्यांच्या मालमत्तेचाही त्यांनी कुठे उल्लेख केला नाही. त्यांनी माझ्यापासून झालेल्या दोन मुलांचा उल्लेख केला आहे. पण आमच्यात मुंबई, संभाजीनगर, पुणे व इतर काही ठिकाणी ज्या केसेस पेंडिंग आहेत त्यांचाही उल्लेख त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात केला नाही.
कायद्यानुसार निवडणूक अर्ज भरताना एखादी माहिती लपवून ठेवली तर संबंधितांना 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते. त्याला पुराव्याची गरज नाही. कारण सर्व कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेत, असेही वकील म्हणाले.





