‘ती’ मुंडे अन् बीडची, ‘संपदा’च्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर…; धनंजय मुंडेंचा इशारा

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आणि मूळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील २८ वर्षीय डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने महाराष्ट्र हादरला आहे. गुरुवारी (२३ ऑक्टोबर) रात्री फलटण येथील एका हॉटेलच्या खोलीत त्यांनी आपलं जीवन संपवले.
या घटनेने वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत, डॉ. संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे आणि त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले आहे. विशेषतः, त्या मुंडे समाजातील आणि बीडच्या असल्याने त्यांच्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे “अतिशय गंभीर” असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सुसाईड नोटमधील धक्कादायक आरोप
डॉ. मुंडे यांच्या डाव्या हातावर पेनाने लिहिलेल्या सुसाईड नोटमधून गंभीर खुलासे समोर आले आहेत. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदने याच्यावर चार वेळा बलात्काराचा आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याच्यावर चार महिन्यांपासून शारीरिक व मानसिक छळाचा आरोप केला आहे. तसेच, त्यांच्यावर पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्याचा आणि चुकीची फिटनेस प्रमाणपत्रे देण्याचा दबाव होता, यामुळे त्या प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या.
त्यांनी जून २०२५ मध्ये DSP फलटण यांना पत्र लिहून बदने, उपविभागीय पोलिस निरीक्षक पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक लाडपुत्र यांच्यावर छळाचा आरोप केला होता. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची निराशा वाढली. धनंजय मुंडे यांनी या मुद्द्यावर जोर देत, त्या मुंडे समाजातील आणि बीडच्या असल्याने त्यांच्या तक्रारी जाणीवपूर्वक डावलल्या गेल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे रुग्णसेवेत असलेल्या व मूळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टर यांच्याबाबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. माझ्या त्या डॉक्टर भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या अकाली निधनाने कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे.
या घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावे, तसेच ती मुंडे आहे व बीडची आहे म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र एस आय टी नेमून चौकशी करण्यात यावी तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जावे व दोषींना कडक शासन व्हावे, याबाबत उद्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना पत्र देणार आहे.



