Dhananjay Munde : अजित पवारांच्या आठवणीत धनंजय मुंडे भावुक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे सलोख्याचे व घट्ट राजकीय संबंध नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही. अशातच, त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एक अत्यंत संवेदनशील आणि मोठा निर्णय घेतला आहे.
आपला आगामी वाढदिवस कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता, पूर्णपणे साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे सलोख्याचे व घट्ट राजकीय संबंध नेहमीच चर्चेत राहिले आहेत. बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात अजित पवारांचे अकाली निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. विकासाची तीव्र ओढ असलेला आणि प्रशासनावर प्रचंड पकड असलेला एक खंबीर नेता गमावल्यामुळे राज्याचे कधीही न भरून निघणारे मोठे नुकसान झाले आहे.
अजूनही अजितदादांच्या आठवणीने अनेकांचे मन हेलावते, अशा परिस्थितीत रात्रंदिवस त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे धनंजय मुंडे यांचा वाढदिवस जवळ आला आहे. परंतु, अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली मोठी पोकळी आणि डोंगराएवढे दुःख समोर असताना, कुठलाही उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत भावुक निर्णय धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी घेतला आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना धनंजय मुंडे यांनी सांगितले की, जीवनात काही क्षण असे असतात की, ते कोणताही उत्सव साजरा करण्यापेक्षा संवेदना आणि समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतात. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने आपण सर्वजण अत्यंत दुःखी आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेसाठी अखंड झटणारा आणि विकासाला दिशा देणारा एक मोठा आधारवड आपण गमावला असून, त्यांच्या आठवणींना विनम्र अभिवादन करत असताना कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा करणे माझ्या मनाला मुळीच पटत नाही.
अजितदादांच्या निधनाच्या दुःखासोबतच सध्या परळी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण परिसरात अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेच्या छायेत वावरत आहेत. पावसाच्या प्रत्येक सरीकडे आशेने पाहणारा शेतकरी आजही आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. अशा वेदनादायी परिस्थितीत माझा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याचा विचारही मनाला शिवत नाही.
म्हणूनच, १५ जुलै रोजी असणाऱ्या माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज, स्वागत कमानी, फटाक्यांची आतषबाजी, मिरवणुका किंवा उत्सवी कार्यक्रम आयोजित करू नयेत, अशी कळकळीची विनंती त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, मित्रपरिवाराला आणि जनतेला केली आहे.
वाढदिवस साजरा करण्याऐजी माझ्यावरील आपल्या प्रेमाचे रूप समाजसेवेत दिसू द्या, असे आवाहन करत त्यांनी कार्यकर्त्यांना सामाजिक उपक्रम राबवण्यास सांगितले आहे. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष दत्तक घेऊन त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, तसेच आपल्या गावातील किंवा प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला हातभार लावावा.
याचसोबत अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि ज्ञानदान हीच सर्वात मोठी सेवा असल्याने स्थानिक वाचनालयांना पुस्तके भेट द्यावीत. एखाद्या गरजू कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
शेवटी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, माझ्यासाठी वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा दिवस नाही, तर समाजाचे ऋण फेडण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. तुम्ही केलेला प्रत्येक समाजोपयोगी उपक्रम, प्रत्येक मदतीचा हात आणि प्रत्येक सेवाभावाचे कार्य हीच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान भेट असेल. या समाजसेवेच्या माध्यमातूनच आपण सर्वांनी दिवंगत अजितदादांना खरी आदरांजली अर्पण करूया, असे भावनिक आवाहन त्यांनी (Dhananjay Munde) केले आहे.






