बीड : श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठा सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही उपस्थिती लावली. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंची हजेरी लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे अस्वस्थ असल्याच्या चर्चा काही काळापासून सुरू आहेत. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीतीलच काही लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात उघड भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच मुंडे हे परळी वगळता जिल्ह्यातील इतर राष्ट्रवादी कार्यक्रमांपासून दूर राहत असल्याचे दिसून येते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड जिल्ह्यात झालेल्या सहा सभांना धनंजय मुंडे गैरहजर राहिले होते. वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी रोजी बीडमध्ये अजित पवारांची सभा झाली होती. त्या वेळी कौटुंबिक कारण देत आपण बाहेरगावी असल्याचे सांगून मुंडे यांनी सभेला दांडी मारली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी बीड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्याने त्यांच्या अनुपस्थितीबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्हा दौऱ्यावर असताना धनंजय मुंडे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित दिसून आले. त्यामुळे मुंडे राष्ट्रवादीत नाराज असून ते वेगळी राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत का, अशी चर्चा रंगू लागली आहे. दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हा मुख्य आरोपी म्हणून अद्याप कारागृहात आहे. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून काहीसे अंतर ठेवले होते. अजित पवार अनेक वेळा बीड दौऱ्यावर आले असताना मुंडेंची अनुपस्थिती ठळकपणे जाणवत होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात धनंजय मुंडे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.