Mahbub Ali Zaki : धक्कादायक! क्रिकेट विश्वावर पसरली शोककळा; सामन्यापूर्वीच मैदानात कोचचं हृदयविकाराने निधन

Assistant Coach Mahbub Ali Zaki dies heart attack : बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) २०२५ च्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली असली, तरी क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. मोसमातील पहिल्या सामन्यापूर्वी ढाका कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक महबूब अली जकी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मैदानावरच कोसळले जकी –
मिळालेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबर रोजी राजशाही वॉरियर्स आणि ढाका कॅपिटल्स यांच्यात हंगामातील पहिला सामना खेळवला जाणार होता. या सामन्यापूर्वी सिलहट इंटरनॅशनल स्टेडियमवर ढाका कॅपिटल्सचा संघ सराव करत होता. महबूब अली जकी यांनी प्री-मॅच ड्रिलमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता आणि ते संघाच्या तयारीबद्दल चर्चाही करत होते.
The Bangladesh Cricket Board deeply mourns the passing of Mahbub Ali Zaki (59), Specialist Pace Bowling Coach of the BCB Game Development Department and Assistant Coach of Dhaka Capitals in the Bangladesh Premier League (BPL) T20 2026.
He passed away today, 27 December 2025, in… pic.twitter.com/KVv9FwrWOF
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 27, 2025
मात्र, सराव सत्र संपत असतानाच ते अचानक मैदानावर बेशुद्ध होऊन कोसळले. त्यांना तातडीने मैदानावरच सीपीआर (CPR) देण्यात आला आणि रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून श्रद्धांजली –
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) या घटनेवर शोक व्यक्त करताना म्हटले की, “गेम डेव्हलपमेंट विभागाचे तज्ज्ञ वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक महबूब अली जकी यांच्या निधनाने बीसीबीला खोलवर दुःख झाले आहे. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. बांगलादेशातील वेगवान गोलंदाजी विकसित करण्यात त्यांचे योगदान अमूल्य होते.”
हेही वाचा – MS Dhoni : भाईजानच्या पार्टीत कॅप्टन कूलचा जलवा! सलमानच्या ६०व्या बर्थडेला धोनीची हजेरी, VIDEO व्हायरल
दिग्गज खेळाडूंचे होते मार्गदर्शक –
महबूब अली जकी यांनी बांगलादेश क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या होत्या. ते अनेक नामवंत खेळाडूंचे मार्गदर्शक (Mentor) राहिले आहेत. विशेष म्हणजे, २०२० मध्ये जेव्हा बांगलादेशच्या १९ वर्षांखालील संघाने विश्वचषक जिंकला होता, तेव्हा जकी त्या कोचिंग स्टाफचा महत्त्वाचा भाग होते. ढाका कॅपिटल्सनेही आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून जकी यांना श्रद्धांजली वाहिली.





